‘अमेरिका इज बॅक’ आता आमनेसामने मुकाबला होणार; बायडन यांचा चीनला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी आपले पहिले राजनैतिक भाषण केले. त्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय मंचावरून चीनला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी ‘अमेरिका इज बॅक’ ची घोषणा करत आता आमनेसामने मुकाबला होणार आहे, असा इशारा चीनला दिला आहे. चीनकडून उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा अमेरिका मुकाबला करणार आहे. तसेच देशहितासाठी चीनसोबत एकत्र येत काम करण्यासही तयार असल्याचे बायडन यांनी सांगितले.

बायडन विदेश मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांशी फॉगी बॉटम मुख्यालयात संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले, चीनकडून होणारे आर्थिक शोषण खपवून घेतले जाणार नाही. त्याचा कठोरतेने मुकाबला करण्यात येईल. मानवाधिकार, बौद्धिक संपदा आणि जागतिक प्रशासनावर चीनकडून सुरू असलेले हल्ले रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या भाषणातून बायडन यांनी चीनबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेच्या हितासाठी चीनसोबत एकत्र काम करण्यासही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही आमचे सहकारी देश आणि भागीदारांसोबत एकत्र काम करत आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची भूमिका सक्षमतेने मांडणार आहोत. अमेरिकेची विश्वसनीयता आणि नैतिक अधिकार पुन्हा मिळवून देशाला अधिक सक्षम करणार असल्याचे बायडन यांनी सांगितले.

जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच शोषणाविरोधात कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील भागादारी वाढवत जगाचे नेतृत्व करण्यासाठी अमेरिका पुढे सरसावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी अमेरिकेने विविध योजनांवर काम सरू केले असल्याचेही ते म्हणाले.

आपल्या भाषणात बायडन यांनी रशिया आणि चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच म्यानमारमधील सैन्यच्या नेत्यांना सत्ताबदलाच्या घडामोडींना पूर्णविराम देण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे येमेनमध्ये सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्करी मोहिम थांबवण्याची घोषणाही त्यांनी केली.

जगासमोरील नवी आव्हाने अमेरिकेला समजून घ्यावी लागतील. त्यात रशिया आणि चीनची वाढती महत्त्वाकांक्षा आणि लोकशाहीला धोका निर्माण करणारी त्यांच्या कुरघोडींचा अमेरिकेला समाचार घ्याला लागणार आहे, असे ते म्हणाले. जागतिक तापमानवाढ, वातावरण बदलापासून अणुकरारापर्यंतच्या सर्व जागतिक संकटांचा अमेरिकेला सामना करायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चीनच्या आव्हानांचा मुकाबला करणार
चीनकडून सुरू असलेल्या आर्थिक शोषणाचा मुकाबला करण्यास प्राधान्य देणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी सांगितले. चीनच्या आर्थिक शोषणामुळे अमेरिकेतील नोकऱ्या, रोजगार आणि कर्मचाऱ्यांवर परिणाम होत असल्याने या आव्हानांचा मुकाबला करण्यास प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.