
करिअरच्या गेल्या 30 ते 35 वर्षांत मी 14 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यातली बहुतेक गाणी सुपरहिट झाली. असे असतानाही आजवर एकदाही मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही. बऱ्याचदा योग्यता नसलेल्यांनाही राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. त्यामुळे काही ना काही झोल, गडबड घोटाळा मला यात वाटतोय, अशी टीका ज्येष्ठ गायक कुमार सानू यांनी एका मुलाखतीत केली.
‘मै दुनिया भुला दुंगा’, ’चुरा के दिल मेरा’ अशी नव्वदच्या दशकातील हजारो हिट गाणी गाऊन कुमार सानू यांनी रसिकांच्या मनाकर अधिराज्य गाजवले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आले आहे. परंतु राष्ट्रीय पुरस्कार एकदाही त्यांच्या वाटय़ाला आला नाही.
कुमार सानू म्हणाले, 1990 ते 1996 या सलग सात वर्षांत मला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता. कारण या वर्षांत माझी सर्व गाणी हिट झाली होती. ‘घुंघट की आड से’ गाण्यासाठी अलका याज्ञिक यांना पुरस्कार मिळाला, पण मला नाही. कदाचित मी राष्ट्रीय पुरस्काराच्या योग्यतेचा नसेन. आता तर मी या राष्ट्रीय पुरस्कारांची अपेक्षाही सोडली आहे. जेव्हा मिळायला पाहिजे होता तेव्हा मिळाला नाही तर आता काय मिळणार, असेही ते म्हणाले.

































































