
कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल तोंडावर बोट ठेवलेल्या बॉलीवूडमधील दिग्गजांवर ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘बॉलीवूडमधील दिग्गज शेतकरी आंदोलनावर गप्प आहेत. आपल्याला बरंच काही गमवावं लागेल असे त्यांना वाटते. अरे जर सात पिढय़ा बसून खातील इतकं कमावलंत तर किती गमावणार आहात? असा सवाल त्यांनी केला आहे.
नसिरुद्दीन शाह हे बॉलीवूडमधील एक संवेदनशील अभिनेते म्हणून ओळखले जातात. शेतकरी आंदोलनाबद्दल बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. त्याबद्दल शाह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘सर्व काही उद्ध्वस्त झालं तर तुम्हाला तुमच्या शत्रूंचा आवाज ऐकू येणार नाही, मित्रांची शांतता जास्त उद्विग्न करेल. शेतकरी तिकडे कडाक्याच्या थंडीत बसले आहेत तर मला काहीच फरक पडत नाही असे आपण बोलू शकत नाही. शेतकऱयांचे हे आंदोलन वाढत जाईल आणि त्यात सामान्य नागरिकही सहभागी होती अशी मला आशा आहे. गप्प राहणे म्हणजे अन्याय करणाऱयाची बाजू घेण्यासारखे आहे असे मी मानतो.’ असे नसिरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे.
हिंदी सिनेमा पसंत नाही म्हणणाऱयांना गद्दार ठरवले जाते
नसिरुद्दीन शाह यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दलही भाष्य केले आहे. ‘सध्याच्या काळात हिंदुस्थानातील वाहतूक नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला राष्ट्रद्रोही म्हटले जाते. हिंदुस्थानी नागरिक एकमेकांचा आदर करत नाही असे म्हटले तर तुम्ही गद्दार ठरता. हिंदी सिनेमा पसंत नाहीत असे म्हटले तरी तुम्हाला गद्दार ठरवले जाते. असे असेल तर तुम्हाला पाकिस्तानात जावे लागेल.’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
शाहीन बागचे आंदोलन संपवण्यासाठीच लॉकडाऊनचे कारस्थान
लॉकडाऊनबद्दलही नसिरुद्दीन शाह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘कोविडदरम्यान करण्यात आलेला लॉकडाऊन योग्य होता की अयोग्य हे माहीत नाही. पण शाहीन बाग आंदोलन विस्कळीत करण्यासाठी त्याची गरज होती. ते एक मोठे कारस्थानच होते. आता बर्ड फ्लू आलाय तर मला वाटतं शेतकऱयांचे आंदोलन विस्कळीत करण्यासाठी त्याचा वापर सरकारला करता येईल.’ अशी टीका शाह यांनी केली आहे.



























































