
ऑस्ट्रेलियामध्ये दमदार विजय मिळवून घरच्या मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पाहुण्या इंग्लंडने पहिल्याच कसोटीत झुंजार खेळ दाखवत आम्हाला कमी लेखू नका असा इशाराच दिला. नाणेफेक जिंकून इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या द्विशतकी खेळीच्या बळावर पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभारला. यानंतर टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद करत कसोटीवर पकड मिळवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हिंदुस्थानच्या 6 बाद 257 धावा झाल्या होत्या आणि हिंदुस्थानचा संघ अद्यापही 321 धावांनी पिछाडीवर आहे.
चेन्नईच्या मैदानावर पहिले दोन दिवस फलंदाजी करून 578 धावा उभारणाऱ्या इंग्लंडचा पराभव होणे आतातरी शक्य वाटत नाहीय. आता हिंदुस्थानचा संघ ही कसोटी अनिर्णित राखण्यासाठी झुंजताना दिसेल. चौथ्या आणि पाचव्या दिवशी ही कसोटी वाचवण्याचे आव्हान कोहली ब्रिगेडकडे असणार आहे. याला टीम इंडियाची रणनिती देखील कारणीभूत ठरली आहे.
कुलदीप ऐवजी नदीम
अॅडलेड कसोटीनंतर पुन्हा संघात पुनरागमन केलेल्या कोहलीने निवडलेल्या अंतिम -11 खेळाडूंवर सवाल उपस्थित होत आहे. 2019 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळलेल्या कुलदीप यादवला संघात न देता नवख्या शाहबाज नदीमला अंतिम-11 मध्ये स्थान देण्यात आले. पहिल्या डावात तो विशेष पराक्रम गाजवू शकला नाही. त्याने 44 षटकांची गोलंदाजी केली आणि 167 धावा देत फक्त 2 बळी घेतले.
डीआरएस
चेन्नई कसोटीत पहिल्या डावात डीआरएस घेतानाही विराट कोहलीने आपला अनुभव दाखवला नाही. कोहलीला धोनीची अनुपस्थिती नक्कीच जाणवली असणार, कारण तो संघात असताना विराटला मार्गदर्शन करत होता. मात्र चेन्नई कसोटीत पहिल्या डावात कोहलीने घेतलेले तीनही डीआरएस वाया गेले. सलग दोन षटकांमध्ये त्याने दोन डीआरएस गमावले.
INDvsENG पंतने पुन्हा विकेट फेकली, ऑस्ट्रेलियातील चूक इंडियातही केली
रुटची खेळी
इंग्लंड मजबूत स्थितीत असण्यामागे त्यांचा कर्णधार जो रूट याची द्विशतकीय खेळीचा हात आहे. रूटने 218 धावांची खेळी केली. परंतू रूट षटकाकडे वाटचाल करत असतानाही कोहलीने त्याच्यावर दबाव न वाढवता, धावा वाचवण्याकडे लक्ष दिले. आक्रमक क्षेत्ररक्षण न लावल्याने रूटने चौफेर फलंदाजी करत आधी शतक आणि नंतर द्विशतक ठोकले.
वेळेत नवीन चेंडू घेण्याकडे दुर्लक्ष
दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या अर्ध्या तासात टीम इंडियाकडे नवीन चेंडू घेण्याची संधी होती. मात्र कोहलीने जुनाच चेंडू वापरण्याचे ठरवले आणि हा निर्णय अंगलट आला. रुट बाद झाला तेव्हा इंग्लंडच्या 477 धावा झाल्या होत्या आणि तेव्हाच नवीन चेंडू घेणे अपेक्षित होते, मात्र कोहलीने त्यानंतर 6 षटकांनी नवीन चेंडू घेतला. याचा फायदा इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी घेतला आणि सेट होत अखेरच्या तीन खेळाडूंनी 101 धावाही चोपल्या.




























































