जनतेचे खिसे कसे कापतो हे लक्षात येऊ नये म्हणून केंद्र सरकारने चाल खेळली; रोहित पवार यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल-डिझेलवरील करांच्या माध्यमातून राज्यांना वाटा द्यावा लागू नये आणि आपलेच खिसे भरताना जनतेचे खिसे कसे कापतो हे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून केंद्र सरकारने चाल खेळली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीत ज्या बेसिक एक्साइज डय़ुटीमध्ये वाटा मिळतो नेमकी त्यातच कपात करण्यात आली आहे. मात्र केंद्राने आपल्या करात कोणतीही कपात न करता सर्वसामान्यांचे खिसे कापण्याचे धोरण सुरू ठेवले असून भाजप नेत्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करीत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. रोहित पवार यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या जाहिरातीचाही पह्टो शेअर केला आहे. रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ‘पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आज गगनाला भिडल्यात. पुण्यात पेट्रोलचा दर 93 रु. प्रति लिटर आहे. वास्तविक, सगळय़ाच कंपन्यांची पेट्रोलची बेसिक किंमत 29.34 रु. प्रति लिटरच्या घरात आहे. यावर केंद्राचा एकूण कर 32.98 रु., डीलरचं कमिशन 3.69 रु, तर राज्याचा कर 26 ते 27 रुपयाच्या दरम्यान आहे.

केंद्राचे कर बघितले तर त्यात बेसिक एक्साइज डय़ुटी 1.40 रु., स्पेशल ऑडिशनल एक्साइज डय़ुटी 11 रु, पृषि सेस 2.5 रु, रस्ते आणि पायाभूत सुविधा सेस 18 रु असे एपूण 32.90 रु एका लिटरमागे केंद्र सरकार वसूल करतं. या 32.90 रु करापैकी केवळ बेसिक एक्साइज डय़ुटीमध्येच राज्यांना वाटा मिळतो. सेस आणि स्पेशल ऑडिशनल एक्साइज डय़ुटीमध्ये राज्यांना वाटा मिळत नाही. केंद्राने नेमकी त्यातच कपात केली. अशा प्रकारे राज्यांचा खिसा कापल्यामुळे केंद्रीय करातील वाटय़ापोटी राज्यांना मिळणारी रक्कम घटणार असून महाराष्ट्राला 2021-22 या आर्थिक वर्षात केवळ 42043 कोटी रुपये मिळणार आहेत,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

भाजपने पेट्रोलवरील कर 350 टक्क्यांनी वाढवला
‘2014 मध्ये भाजपाने सत्ता हातात घेतली तेव्हा पेट्रोलवर 9.5 रुपये कर आकारला जात होता. आज हाच कर 32.90 रुपयांवर गेला. म्हणजेच त्यात तब्बल 350टक्क्यांनी वाढ झाली. डिझेलबाबत बघितलं तर 2014 मध्ये केंद्र सरकार 3.56 रुपये कर आकारात होतं, आज त्यात सुमारे 900 टक्क्यांनी वाढ झाली असून, आज तो 31.80 रु पर्यंत पोहचलाय.पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढून महागाई प्रचंड वाढल्याचं आकांडतांडव करणाऱ्या भाजपच्या जाहिराती अजून जनता विसरली नाही. पण त्या फक्त दिशाभूल करण्यासाठीच केल्या होत्या हे आता पेट्रोल-डिझेलच्या भडक्यात होरपळून निघत असलेल्या जनतेलाही कळलंय. त्यामुळं ‘जनता माफ नहीं करेगी’चं बुमरँग भाजपावर उलटल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.