
हिंदुस्थानी संघाचा इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव झाला आहे. पाहुण्या संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला 227 धावांनी पराभूत केलं. हिंदुस्थानी संघाचा दुसरा डाव 192 धावांवर आटोपला. इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीच हा सामन्याच्या अखेरच्या दिवशी यशस्वी गोलंदाज ठरला असून त्याने दुसऱ्या डावात 4 बळी टीपले. जेम्स अँडरसन याने 3 बळी टीपत लीचला उत्तम साथ दिली. हिंदुस्थानी संघाचे 3 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. यामध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणे याचाही समावेश आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम यांनाही भोपळा फोडता आला नाही.
हिंदुस्थानी संघातर्फे विराट कोहली आणि शुभमन गिल सोडल्यास इतर सर्वांनी निराशा केली. कोहलीने 72 धावा केल्या तर गिल याने 50 धावा केल्या होत्या. चेन्नई येथील चेपॉक मैदानावर हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. इंग्लंडचा दुसरा डाव 178 धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर हिंदुस्थानसमोर चौथ्या डावात विजयासाठी 420 धावांचे आव्हान उभे ठाकले होते. हिंदुस्थानने चौथ्या दिवसअखेरीस 1 बाद 39 धावा केल्या होत्या आणि मंगळवारी विजयासाठी टीम इंडियाला आणखी 381 धावांची आवश्यकता होती.
पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभारणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 178 धावांमध्येच गडगडला होता. कर्णधार जो रूटने दुसऱ्या डावात पुन्हा एकदा सर्वाधिक 40 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने 61 धावा देत सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. शाहबाज नदीमने दोन, इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला होता. चेन्नईतील कसोटीच्या पहिल्या दिवशी फक्त तीनच फलंदाज बाद झाले. दुसऱ्या दिवशी पाच फलंदाज तंबूत गेले. तिसऱ्या दिवशी आठ फलंदाजांनी पॅव्हेलियनचा रस्ता पकडला. मात्र चौथ्या दिवशी चक्क 15 फलंदाज माघारी परतले होते.




























































