लेख – शेतकरी-कामगारांचा विचार सरकार करणार का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • रमेश कृष्णराव लांजेवार

शेतकऱ्यांना कृषी कायद्याबद्दल सरकारने विचारणाच केली नाही तर शेतकरी सरकारशी कशी काय चर्चा करणार? त्यामुळे सरकारने व पंतप्रधानांनी नवीन कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांसोबत नव्याने चर्चा करायला पाहिजे. कोणीही शेतकऱ्यांच्या मुद्दय़ाला राजकीय मुद्दा बनवू नये. शेतकऱ्यांप्रमाणेच आज ईपीएस-95 पेन्शनधारकांची परिस्थिती दिसून येते. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात असे दिसून आले की, ‘ईपीएस पेन्शनधारक उपाशी व खासगी उद्योजक तुपाशी’. त्यामुळे सरकारने अन्नदाता शेतकरी व कामगार यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, तेव्हाच देशाचे भविष्य उज्ज्वल होईल.

एक देश एक राशन कार्ड ठीक! परंतु एक देश समान वेतन, समान पेन्शन व समान अधिकार का नाही? अर्थसंकल्प स्वागतार्ह, परंतु महागाई, ईपीएस-95 च्या बाबतीत व नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या बाबतीत सरकार शांत का? सरकारने अनेक विकासकामांचे निर्णय घेतले; परंतु महागाईने गरीब व सर्वसामान्य नागरिकांचे पंबरडे मोडले आहे. आज पेट्रोल-डिझेलचे भाव आभाळाला टेकले. यामुळे देशातील 130 कोटी जनता हताश आहे. पेट्रोल-डिझेल भाववाढीचा असर सरळ आम नागरिकांवर पडत असल्याचे दिसून येते. यामुळे आवश्यक वस्तूंच्या भावांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक बेघर झाले. यावर सरकारने जातीने लक्ष दिल्याचे दिसत नाही.

शिक्षण क्षेत्रात सरकारने भर देण्याचा प्रयत्न केला, परंतु शिक्षण प्रणालीमध्ये अनेक त्रुटय़ा दिसून येतात. आताही अनेक शिक्षक संस्था मोठय़ा प्रमाणात फीच्या नावावर डोनेशन उकळताना दिसतात. आजही लाखो विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येते. त्यामुळे शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अट न टाकता संपूर्ण शिक्षण मोफत करायला पाहिजे होते. कारण कोरोना महामारी व महागाईने गरीब व सर्वसामान्यांचे पंबरडे मोडले आहे. अशा कठीण परिस्थितीत सरकारचे दायित्व होते की संपूर्ण शिक्षण मोफतची घोषणा करायला पाहिजे होती. हिंदुस्थान आत्मनिर्भर बनत आहे आणि बनायलासुद्धा पाहिजे, परंतु सर्वसामान्य व गरीबांचे खिसे कापून नाही. हिंदुस्थान आज संपूर्ण जगात बलशाली आणि आत्मनिर्भर होत आहे ही गौरवास्पद बाब आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागपूर मेट्रोसाठी 5976 कोटींची तरतूद केली याचे मी स्वागत करतो. यामुळे महाराष्ट्राच्या उपराजधानीचा मान उंचावेल. काही निर्णय चांगले असले तरी आणखी एक मोठा निर्णय घेण्यापासून चुकल्याचे दिसून येते.

गेल्या अनेक वर्षांपासून ईपीएस-95 चा पेन्शनधारक आपल्या हक्कासाठी झुंज देत आहे, परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 75 लाख ईपीएस-95 च्या पेन्शनधारकांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसून येते. आज 60 ते 80 वर्षांचा म्हातारा पेन्शनधारक सरकारला फक्त जगण्याइतकी पेन्शन देण्याची मागणी सरकारला करीत आहे. पेन्शनधारक ज्या पेन्शनची मागणी करीत आहेत ते पेन्शन पेन्शनधारकांना सरकारच्या तिजोरीतून नकोच आहे. ईपीएस-95 पेन्शनधारक त्यांच्या पेन्शन फंडांमध्ये कटलेला पैसा रीतसररीत्या सरकारजवळ मागणी करीत आहे, परंतु पेन्शनधारकांचे अब्जावधी रुपये सरकारने इतरत्र वळविल्यामुळे सरकार ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या बाबतीत मौन धारण केल्याचे स्पष्ट दिसून येते. कमीत कमी 7500 रुपये पेन्शन, महागाई भत्ता व कोशियारी समितीच्या अटी लागू करणे यावर सुप्रीम कोर्टसुद्धा राजी आहे, परंतु सरकार ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या बाबतीत उदासिन असल्याचे स्पष्ट दिसून येते. पेन्शनधारकांना आशा होती की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या आशा उंचावेल, परंतु ईपीएस पेन्शनधारकांना सरकारने निराश केल्याचे स्पष्ट दिसून येते. हिंदुस्थानात लोकशाही आहे. त्यामुळे समान हक्क, समान कायदा, समान न्याय, समान अधिकार अशी भाषा राजकीय वर्तुळातून आपण नेहमी ऐकत असतो, परंतु ईपीएस पेन्शनधारकांना प्रश्न आहे की, लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी, समाजसेवक यांना सरकार गलेलठ्ठ पगार, भत्ते, इतर सुविधा व पेन्शन कशाच्या आधारावर देत असते? व्यक्ती आपल्या हक्कासाठी लढतो आणि हक्काचा पैसा सरकारला मागतो, मग सरकार का देत नाही?

26 नोव्हेंबरपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात संघर्ष करीत आहे. यात अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले व असे सांगण्यात येते की, पंजाबचे 40 युवक लापता असल्याचे सांगण्यात येते. यावर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर एकही शब्द बोलायला तयार नाहीत. उलट तोमर म्हणतात की, आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या पुटुंबीयांना सरकारी मदत नाही असे वक्तव्य लोकसभेत 2 फेब्रुवारी मंगळवारला देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर सरकार मीठ चोळत असल्याचे स्पष्ट दिसून येते. पंतप्रधान मोदी म्हणतात की, ‘किसान एक पह्न के दुरीपर है.’ पंतप्रधानांना खरोखरच शेतकऱ्यांची एवढी चिंता आहे तर कृषी कायदे बनविण्याच्या आधी शेतकऱ्यांना विश्वासात का घेतले नाही? शेतकऱ्यांना कृषी कायद्याबद्दल सरकारने विचारणाच केली नाही तर शेतकरी सरकारशी कशी काय चर्चा करणार? त्यामुळे सरकारने व पंतप्रधानांनी नवीन कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांसोबत नव्याने चर्चा करायला पाहिजे.

कोणीही शेतकऱ्यांच्या मुद्दय़ाला राजकीय मुद्दा बनवू नये. शेतकऱ्यांप्रमाणेच आज ईपीएस-95 पेन्शनधारकांची परिस्थिती दिसून येते. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात असे दिसून आले की, ‘ईपीएस पेन्शनधारक उपाशी व खासगी उद्योजक तुपाशी’. त्यामुळे सरकारने तळागाळातील लोकांचा विचार करण्याची गरज आहे. सरकारने अन्नदाता शेतकरी व कामगार यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, तेव्हाच देशाचे भविष्य उज्ज्वल होईल.