
इंजिनियरींगच्या प्रथम वर्षासाठी घेण्यात आलेली केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) नुकतीच पूर्ण झाली. राज्यात इंजिनियरींग अभ्यासक्रमांच्या एकूण 1.23 लाख जागांपैकी 44 टक्के म्हणजेच 55 हजार 444 जागा यंदा रिक्त राहिल्या आहेत.
गेल्यावर्षी 1 लाख 27 हजार 537 जागांपैकी 62 हजार 86 जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा फार्मसी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला दिसून आला. फार्मसीच्या फक्त 6 टक्केच जागा रिक्त राहिल्या आहेत. तर व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या 32 टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.
राज्याच्या सीईटी सेलकडून ही माहिती देण्यात आली आहे. सध्या नामवंत कंपन्या सॉफ्टवेअरचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देऊ लागल्याने कॉम्प्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान या विषयांच्या निवडीला यंदाही विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिल्याचे यावेळी दिसून आले. त्याचबरोबर मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनियरींगचीही निवड विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम हा दरवर्षी बदलत असतो असे तज्ञ मंडळी सांगतात.
इलेक्ट्रीक वाहनांचा वापर जगभरात वाढू लागल्याने येत्या काळात मेकॅनिकल इंजिनियरींगच्या उमेदवारांची मागणी वाढेल असा त्यांचा अंदाज आहे.
प्रवेशाला विलंब झाल्याने एमबीएला फटका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू झाल्या. त्याचा फटका व्यवस्थापन प्रवेशांना बसला. व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या 32 टक्के जागा रिक्त राहिल्या. ग्रामीण आणि निमशहरी भागांमधील महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक आहे.
फार्मसीला चांगले दिवस
फार्मसी अभ्यासक्रमाला यावेळी चांगले दिवस आल्याचे दिसून आले. यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा सात हजार अधिक अर्ज फार्मसीसाठी आले होते. फार्मसीमध्ये विद्यार्थ्यांचा रस वाढला असल्याचे हे संकेत आहेत असे तज्ञांनी सांगितले.
त्याचप्रमाणे तंत्रशिक्षण संचालनालयानेही पात्रता निकष बारावीमध्ये 50 टक्के गुणांऐवजी 45 टक्के केल्याचाही हा परिणाम असल्याचे ते सांगतात. कोविडमुळे विद्यार्थी फार्मास्युटिकल्सकडे वळले आहेत आणि अगदी आयटी क्षेत्रातील कंपन्याचाही नोकर्यांसाठी फार्मसी केलेल्या उमेदवारांची निवड करण्याकडे कल वळला असल्याचेही दिसून येते.




























































