
जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याने वापरलेल्या पाश्चिमात्य पद्धतीच्या शौचकुपावरील म्हणजेच कमोडवरील झाकणाचा लिलाव करण्यात आला आहे. हिटलरचा मृतदेह सापडल्यानंतर जी लुटालुट झाली होती त्यादरम्यान एका अमेरिकी सैनिकाने हे झाकण लुटून नेलं होतं. हे झाकण लाकडाचं बनविण्यात आलं असून ते बरघॉफ इथल्या हिटलरच्या घरात बसवण्यात आलेलं होतं. हिटलरच्या सामानाव्यतिरिक्त त्याची बायको इव्हा ब्राऊन हिच्याही सामानाचा लिलाव करण्यात आला आहे.
दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरचा अंत झाला आणि जर्मनीचा पाडाव झाला. यानंतर जी लुटालूट झाली होती त्यामनध्ये अमेरिकेचा सैनिक ‘रेगनवॉल्ड सी बोर्च’ याने कमोडचं हे झाकण लुटून नेलं होतं. जर्मनीमध्ये फ्रेंच आणि जर्मन भाषा बोलू शकणाऱ्या अमेरिकेच्या सैनिकांची तुकडी तैनात करण्यात आली होती. या तुकडीमध्ये रेगनवॉल्ड यांचाही समावेश होता. ते फ्रान्समधील 2 सशस्त्र विभागाचे संपर्क अधिकारी म्हणून कामाला होते.
हिटलरने आत्महत्या केल्यानंतर सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेगनवॉल्ड यांना बरगॉफमधून जे मिळेल ते घेऊन जा असं सांगितलं होतं. बरगॉफ हे मित्र राष्ट्रांच्या फौजांनी केलेल्या हल्ल्यात बेचिराख झालं होतं. रेगनवॉल्ड कमोडचे हे कव्हर घेऊन अमेरिकेत आले होते. त्यांनी त्यांच्या घरातील तळघरात हे कव्हर प्रदर्शनी भागावर लावले होते.
नुकत्यात पार पडलेल्या लिलावामध्ये इव्हा ब्राऊन हिच्या काही वस्तूंचाही लिलाव करण्यात आला आहे. यामध्ये तिच्या अंतर्वस्त्रांचाही समावेश होता. या अंतर्वस्त्राला 1300 पाऊंड म्हणजेच जवळपास 1 लाख 30 हजार रुपये मिळाले आहेत. हिटलरचा फोटो असलेल्या दाढीसाठी वापरण्यात येणाऱ्या मगाला 15600 पाऊंड म्हणजेच जवळपास 15 लाख 72 हजार रुपये मिळाले आहेत.
हिटलर ज्या ब्रशने केस विंचरायचा त्याचाही लिलाव करण्यात आला आहे. या ब्रशमधून हिटलरचे 4 केस मिळाले आहेत. हे 4 केस 1650 पाऊंडांना म्हणजेच जवळपास 1 लाख 66 हजार 293 रुपयांना विकले गेले आहेत. हिटलरने वापरलेल्या कमोडचे झाकण हे 13 लाख 65 हजार 440 रुपयांना विकले गेले आहे.

























































