
कंपनीतून सुटल्यानंतर सायकलवरून घरी चाललेल्या एका कामगाराला दुचाकीस्वार चोरट्यांनी अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केला. त्यानंतर त्यांच्या खिशातील 300 रुपयांची रोकड आणि मोबाईल असा 5 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी विठ्ठल पवार (42, रा. माळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वी विठ्ठल पवार रात्री साडेअकराच्या सुमारास कंपनीतून सुटल्यावर घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांच्यावर कोयत्याने वार करून खिशातील रोकड आणि मोबाईल चोरून नेला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.





























































