रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही तरी ‘नो टेन्शन’, IRCTC ने सुरू केले नवीन फिचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांबचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित व्हावा यासाठी बऱ्याचदा आपण रेल्वेचा पर्याय निवडतो. यासाठी प्रवास करण्याच्या तारखेच्या आधी बुकिंगही करतो. परंतु अनेकदा तिकीट प्रतिक्षा यादित (वेटिंग लिस्ट) मध्ये राहते आणि कन्फर्म होत नाही. त्यामुळे हकनाक त्रास सहन करावा लागतो. तसेच कन्फर्म न झालेल्या तिकीटाचे पैसेही लवकर रिफंड होत नाही. मात्र आता यातून प्रवाश्यांची सुटका होणार आहे.

आयआरसीटीसीने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी आपली वेबसाईट अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेचे बुकिंग करणेही आधीपेक्षा सोपे होणार आहे. तसेच आयआरसीटीसी पेमेंट गेट वे ही सेवाही सुरू करणार असून यामुळे थर्ड पार्टीवर अवलंबून रहावे लागणार नाही. तसेच तिकीट कन्फर्म झाले नाही आणि प्रवाश्याने ते रद्द केल्यास काही मिनिटात पैसे त्याच्या खात्यात जमा होतील.

वेबसाईट आणि मोबाईल अॅप वापरणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी iPay अंतर्गत एक तात्काळ रिफंडसाठी फिचर आयआरसीटीसीने सुरू केले आहे. याचा लाभ घेण्यासाठी युजरला आपल्या बँक खात्याची माहिती एकदाच द्यावी लागेल. तिकीट बुक करताना जी माहिती देण्यात येईल, त्याच माहितीच्या आधारे आणि त्याच बँक खात्यात तिकीट रद्द केल्यावर थेट पैसे जमा केले जातील.

तसेच यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियाही अधिक वेगवान होईल, अशी आशा आयआरसीटीसीला आहे. तसेच काही कारणास्तव तिकीट रद्द (कॅन्सल) झाले तर प्रवाश्याच्या खात्यात तात्काळ रिफंड जमा होईल. याआधी तिकीट रद्द केल्यानंतर खात्यात पैसे जमा होण्यासाठी दोन ते चार दिवसांचा अवधी लागत होता. मात्र आयआरसीटीसीने आणलेल्या नव्या फिचरमुळे या वेळ वाचणार आहे.