
कोरोना तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. राज्याच्या तिजोरीवर एक लाख कोटी रुपयांची आर्थिक तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत सर्वच विभागांनी काटकसर करावी. आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच प्रकल्प व कामे हाती घ्यावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या सर्व विभागांना दिल्या आहेत.
राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत वित्त विभागाकडून मंत्रिमंडळाला बुधवारी सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणानंतर अजित पवार यांनी याविषयीच्या सूचना प्रशासकीय विभागांना दिल्या. राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला तेव्हा 9511 कोटींची तूट अपेक्षित होती व ती आता एक लाख कोटींपर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर आलेल्या बोजामुळे चालू आर्थिक वर्षात योजनेचे आकारमानातील तरतुदींपैकी फक्त 33 टक्के खर्च करता येणार आहे. त्यात वाढ केली जाणार नाही असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
जानेवारीअखेर 55 टक्के महसूल, 45 टक्के तूट
जानेवारीअखेर सरकारला 55 टक्के महसूल मिळाला आहे. तर 45 टक्के तूट निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे केंद्राकडून 27 हजार कोटींची जीएसटीची थकबाकी येणे आहे. परिणामी राज्याला या आर्थिक वर्षात सुमारे एक लाख कोटी रुपयांची तूट अपेक्षित असल्याने यंदा व पुढील वर्षीही विकासकामांवर मोठय़ा प्रमाणावर परिणाम होणार आहे.
जिल्हा नियोजन निधीला, दलित व आदिवासी योजना निधीला कात्री नाही
आर्थिक तूट असली तरी शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना नुकसानभरपाई, कोरोनावरील उपाययोजनांवरील खर्च, आमदार निधी यासाठी राज्य सरकारने खर्च करण्यास हात मागे घेतला नाही. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजनावर कोणतीही कात्री नाही. दलित व आदिवासी योजनांसाठीही पूर्णतः तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.































































