
नॅशनल कॅडेट कोर्स म्हणजेच NCC ने 8 ते 12 फेब्रुवारी 2021 दरम्यान वार्षित प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे योग्य ती सावधगिरी बाळगत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या कॅडेट्ससाठी हे शिबीर असणार आहे. अंधेरीतील भवन्स महाविद्यालयामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची महाराष्ट्राच्या एन. सी. सी. संचालनयचे उपसंचालक (डी डी जे ) ब्रिगे .शुबोजित लहरी यांनी नुकतीच पाहणी केली होती.
कमांडींग ऑफिसर कर्नल एम.एल.शर्मा यांच्या अंतर्गत 8 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन. सी. सी.ने हे शिबीर सुरू केले आहे. ही बटालियन केवळ मुलींसाठी असून मुंबई ‘अ’ ग्रुप अंतर्गत हाजी अली इथे कार्यरत आहे. ग्रुप ‘अ’ चे ग्रुप कमांडर ब्रिगे . ग. स. चिमा यांचे या शिबिराला मार्गदर्शन लाभलेले आहे. हे शिबीर तृतीय वर्षांच्या कॅडेट्ससाठी 5 दिवसांचे तर द्वितीय वर्षाच्या कॅडेट्स साठी 3 दिवसांचे असणार आहे.
भवन्स – अंधेरी , सोनोपंत दांडेकर- पालघर, घनश्यामदास सराफ – मालाड , पाटकर वर्दे – गोरेगांव , साठे – विले पार्ले, चेतना – वांद्रे , खालसा – माटुंगा आणि अस्मिता – विक्रोळी या महाविद्यालयांचे मिळून एकूण 280 कॅडेट्स या शिबिरात सहभागी झाले आहेत. या शिबिरात कॅडेट्सचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतले जाणार आहे. हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देणं अशक्य असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरानंतर कॅडेटना मिळणारे प्रमाणपत्र सैन्य भरती किंवा सरकारी नोकरीसाठी उपयुक्त ठरते.


























































