
मागील मार्च महिन्यापासून कोरोनामुळे बंद असलेले शाळा-कॉलेजचे दरवाजे ऐन परीक्षांच्या तोंडावर उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 22 फेब्रुवारीपासून एमएमआर विभागातील शैक्षणिक संस्था सुरू होण्यासंदर्भात प्रस्ताव आहे, असे सूतोवाच मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 15 फेब्रुवारीपासून राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित कॉलेज सुरू करण्याची परवानगी दिली आहे. विभागाच्या वतीने कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबईतील कॉलेज सुरू करण्याच्या परवानगीसाठी आयुक्तांना पत्र पाठविले असून या पार्श्वभूमीवर शुक्रवारी खासगी कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने चहल यांची भेट घेऊन शाळा-कॉलेजसोबतच क्लासेसही सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहूनच निर्णय
शाळा आणि कॉलेज सुरू करण्याआधी 1 फेब्रुवारीपासून एमएमआर विभागातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे यावेळी चहल यांनी सांगितले. कोरोनाच्या केसेस आढळण्याचे प्रमाण कमी असेल तरच शाळा-कॉलेज सुरू करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे चहल यांनी स्पष्ट केले. मात्र कोरोनाच्या केसेस वाढल्या तर शाळा-कॉलेज सुरू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.



























































