
सांगली महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आठ दिवसांचा कालावधी आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. येत्या रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सांगलीत आहेत. यावेळी नगरसेवकांची मते अजमाविली जाण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेस उमेदवारांचा फैसला जयश्रीताई पाटील यांच्या हाती आहे.
महापालिकेच्या नव्या महापौर-उपमहापौरांची 23 फेब्रुवारी रोजी निवड होणार आहे. त्यासाठी 18 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सत्ताधारी भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.
निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, स्वाती शिंदे यांच्यासह विद्यमान महापौर गीता सुतार यांनीही दावा केला आहे. तर, काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, तर राष्ट्रवादीतून गटनेते मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, दिग्विजय सूर्यवंशी यांनी निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीत अजूनही महापौर-उपमहापौर पदांच्या उमेदवारीवरून धुसफूस सुरू आहे. राष्ट्रवादीने महापौरपदावर दावा केल्याने काँग्रेसचे नगरसेवक नाराज आहेत.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रविवारी सांगलीत आहेत. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत चर्चा होणार असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. त्याला जोडून महापौरपदाबाबतही इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या इच्छुकांनी पक्षाच्या खासदार-आमदारांसह कोअर कमिटीच्या सदस्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
पक्षाच्या कार्यक्रमाला नगरसेवकांची हजेरी वाढली आहे. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही रविवारी जिह्यात येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. नगरसेवकांच्या भेटीनंतर जयंत पाटील काय निर्णय घेणार आहेत, यावरही महापालिकेतील महापौर-उपमहापौर निवडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.




























































