अंतराळ – टायटन उपग्रहावर रोबोटिक पाणबुडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुजाता बाबर

टायटन हा उपग्रह सध्या खूपच चर्चेत आहे. त्यावरील क्रेकेन सागराची खोली 1000 फूट आहे हे समजल्याने त्यामध्ये आता आपण पाणबुडय़ा पाठवू शकू आणि टायटनवरील परजीवांचा अभ्यास करू शकू असा नवा उत्साह शास्त्र्ाज्ञांमध्ये निर्माण झाला आहे.

शनी हा ग्रह आकाश निरीक्षकांचा आवडता ग्रह. त्याच्याभोवती असलेल्या कडय़ांमुळे तो दूरदर्शीमधून अतिशय सुंदर दिसतो. शनी हा वायुरूप ग्रह असून त्याला 82 उपग्रह असावेत असा अंदाज वर्तवला जातो. त्यापैकी 53 हे ज्ञात उपग्रह आहेत. टायटन हा शनीचा सर्वात मोठा उपग्रह आहे. टायटन म्हणजे एक बर्फाळ जग आहे. त्याचा पृष्ठभाग चमकदार आणि दाट वातावरणामुळे पूर्णपणे अस्पष्ट दिसतो. टायटन हा आपल्या सौरमालेतील दुसरा सर्वात मोठा उपग्रह आहे. आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा उपग्रह गॅनिमिड (गुरू ग्रहाचा उपग्रह) हा टायटनच्या केवळ 2 टक्क्यांनी मोठा आहे. टायटन हा पृथ्वीच्या चंद्रापेक्षा आणि बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे. टायटनवर सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी सुमारे 80 मिनिटे लागतात. या अंतरामुळे पृथ्वीपेक्षा शनी आणि टायटनवरील सूर्यप्रकाश सुमारे 100 पट दुर्बल किंवा अंधुक आहे. शनीभोवती परिभ्रमण करण्यासाठी टायटनला 15 पृथ्वी दिवस आणि 22 पृथ्वी तास लागतात. टायटन उपग्रहावर अतिशय थंड वातावरण आहे. त्यावरचे तापमान साधारण उणे 179 सेल्सियस आहे. त्याच्या वातावरणात नायट्रोजन वायू अधिक प्रमाणात आहे. या उपग्रहावर पाणी हे कडक खडकांच्या स्वरूपात आहे. युरोपा आणि एन्सेलेडसप्रमाणे टायटनच्या पृष्ठभागाखालीदेखील पाण्याचे समुद्र असतील असा अंदाज आहे, पण अजून तरी तसे पुरावे सापडले नाहीत.

टायटन हा ग्रह खगोल अभ्यासकांसाठी कायमच आकर्षण राहिला आहे. टायटन ही आपल्या सूर्यमालेतील अशी वस्तू आहे, ज्याचा पृष्ठभाग द्रवरूप आहे. टायटन उपग्रहावर पाऊस आहे, नद्या आहेत, तलाव आहेत आणि समुद्रही, पण ते आहे मिथेन आणि इथेनचे! विशेष म्हणजे टायटन हे आपल्या सौरमालेतील एकमेव ज्ञात ठिकाण आहे, जिथे पृथ्वीवरील जलचक्राप्रमाणे म्हणजे ढगांमधून पाणी (मिथेनचे) पडणे, पृष्ठभागावरून ते वाहणे, तलाव आणि समुद्र भरणे आणि आकाशात बाष्पीकरण होणे अशी प्रक्रिया आढळून येते.

कॅसिनी यानाने या उपग्रहावरील क्रेकेन या समुद्राची खोली 1000 फूट असल्याचा शोध लावला आहे, पण तो पृथ्वीवरील समुद्राप्रमाणे पाण्याचा नाही, तर तो आहे मिथेनचा! या संशोधनावर नुकताच शोधनिबंध जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च यामध्ये प्रसिध्द झाला आहे. याचे मुख्य संशोधक आहे वलेरिओ पोजिली. या शोधामुळे भविष्यात या समुद्रातून जाणाऱया रोबोटिक पाणबुडय़ा पाठवणे आणि त्यातून नवनवीन शोध लावणे हे दालन संशोधकांसाठी उघडले आहे.

टायटन उपग्रहावरील जवळपास सर्व सागरांची खोली मोजण्यात आलेली होती. फक्त क्रेकेन या सागराची खोली आजपर्यंत मोजली गेली नव्हती. याविषयी प्राथमिक माहिती 2014 मध्ये कॅसिनीने प्रथम नोंदवली होती. त्यावेळी कॅसिनीने रडारचा वापर करून टायटनच्या उत्तर ध्रुव भागातील लिगिया, क्रेकेन आणि मॉरे सायनस या सागरांचे निरीक्षण केले होते. यात मॉरे सायनस याची खोली 280 फूट आहे हे समजले होते. क्रेकेन सागरामध्ये इथेन आणि मिथेन या दोन्हीचे मिश्रण आहे.

क्रेकेन सागर हा आकाराने खूप मोठा आहे. उत्तर अमेरिकेतील पाचही मोठे तलाव एकत्र केले तर ते आकाराने क्रेकेन सागराएवढे मोठे असतील. क्रेकेन सागराची खोली 1000 फूट असणे हे संशोधन शास्त्र्ाज्ञांसाठी निश्चितच महत्त्वाचे आहे. त्यामुळे टायटनच्या समुद्रामध्ये रोबोटिक पाणबुडय़ा पाठवणे तर शक्य आहेच. शिवाय परजीवांचे हायड्रोलॉजिक चक्र समजण्यास मदत होईल. यासंदर्भात क्रेकेन आणि मॉरे सायन्स यांची संरचना समजणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे टायटनच्या मिथेन हायड्रोलॉजीचे अधिक अचूक मूल्यांकन शक्य होईल.

या संशोधनामुळे शास्त्र्ाज्ञ आता टायटनवरील समुद्राच्या द्रवाच्या घनतेचे उच्च सूक्ष्मतेसह अनुमान काढू शकतात आणि परिणामी पात्रात असलेल्या वस्तूंची सोनार (SONAR – sound navigation and ranging) मोजणी आणि समुद्राचे दिशात्मक प्रवाह समजून घेऊ शकतात. सोनार म्हणजे पाण्यामध्ये खोलवर असलेल्या वस्तूचा ठावठिकाणा ध्वनिलहरींच्या प्रतिध्वनींच्या सहाय्याने निश्चित करण्याचे साधन किंवा पद्धती होय.

शास्त्र्ाज्ञांच्या मते पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळातील पृथ्वी ज्या स्वरूपात होती, म्हणजे जेव्हा तिच्यावर जीवन नुकतेच विकसित व्हायला सुरुवात झालेली होती, त्या स्वरूपात आज टायटन आहे. त्यामुळे टायटनचा अभ्यास आपल्याला पृथ्वीवरील जीवनाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल किंवा प्रीबायोटिक रसायनशास्त्राविषयी मौल्यवान माहिती मिळू शकते. प्रीबायोटिक रसायनशास्त्र म्हणजे पृथ्वीवर आणि इतरत्र जीवनाच्या उत्पत्तीसाठी सेंद्रिय संयुगे कशी तयार झाली आणि त्यांचे स्व-संयोजन याचा अभ्यास. या समुद्रांमध्ये आणि तलावांमध्ये म्हणजे पाण्यावर नाही, तर मिथेनवर अवलंबून असणारे काही वेगळ्या प्रकारचे जीव किंवा सूक्ष्म जीव असतील का याचा शोध घेता येईल.

आपल्याला अजूनही विश्वातील अनेक रहस्ये माहीत नाहीत. पृथ्वीप्रमाणे नसले तरी वेगळे जीवन असू शकते अशा अवकाशीय वस्तूंपैकी एक वस्तू म्हणजे टायटन उपग्रह! जरी याविषयी पुरावे नसले तरी त्याचे गुंतागुंतीचे रसायनशास्त्र्ा आणि अद्वितीय वातावरण हे सतत शोध घेण्यासाठी शास्त्र्ाज्ञांना खुणावत असते. या नवीन शोधाने यामध्ये अधिक भर पडली आहे हे निश्चित!

 [email protected]