अस्सी, नब्बे, पुरै सौ! ‘या’ राज्यात पेट्रोलने गाठली शंभरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात इंधनदर प्रचंड भडकले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने यात वाढ होताना दिसत असून यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना महामारीमुळे आधीच आर्थिक तंगीत आलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर यामुळे मोठा ताण पडत आहे. अशातच देशातील एका राज्यात पेट्रोलने शंभरी गाठली आहे.

हे राज्य म्हणजे मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 100 रुपये इतकं झालं आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे पेट्रोलचा आजचा दर 100 रुपये 4 पैसे इतका झाला आहे. हा दर पॉवर पेट्रोलचा असून साधारण पेट्रोल 96 रुपये प्रतिलीटर इतकं मिळत आहे. भोपाळमध्ये डीझेलचा दर 86 रुपये 84 पैसे इतका झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश हे देशातील सर्वाधिक किमतीला पेट्रोल विकणारं राज्यं झालं आहे.

यंदाचं वर्षं सुरू झाल्यानंतर तब्बल 17 वेळा पेट्रोल आणि डीझेलचे दर वाढले आहेत. साध्या पेट्रोलची किंमत 96.39 प्रतिलीटर इतकी असून प्रीमियम पेट्रोलचा दर 100.4 रुपये इतका झाला आहे.

मध्य प्रदेशातील जनतेला आता राज्य सरकारकडून दर कमी करण्याच्या अपेक्षा आहेत. कारण इंधनाच्या वाढत्या किमतींवरून केंद्र सरकारने हात झटकले आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या प्रश्नोत्तराच्या काळात विरोधी पक्षाने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींचा मुद्दा उपस्थित केला गेला होता.

या मुद्द्याला उत्तर देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावर केंद्र सरकार काही करू शकत नाही, असे म्हणत हात वर केले होते. पेट्रोल-डिझेलच्या किंमती पेट्रोलियम कंपन्या ठरवतात. तसेच हे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असल्याचेही ते म्हणाले होते.