
रविचंद्रन अश्विनने घरच्या चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर नवा विक्रम प्रस्थापित केला. एका कसोटीत पाच बळी व शंभरी तीन वेळा करण्याची करामत हिंदुस्थानच्या या पठ्ठय़ाने करून दाखवली. इयान बॉथमने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच वेळा असा करिष्मा करून दाखवलाय. त्यानंतर टीम इंडियाच्या रविचंद्रन अश्विनचा नंबर लागतो. या वेळी त्याने गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद, जॅक कॅलीस व शाकीब उल हसन या अष्टपैलू खेळाडूंना मागे टाकले. या चारही अष्टपैलू खेळाडूंनी प्रत्येकी दोन वेळा पाच बळी व शंभर करण्याची किमया साधली आहे.
आता बॉथम, इम्रानची बरोबरी करण्याची संधी
रविचंद्रन अश्विनला इम्रान खान व इयान बॉथम या महान क्रिकेटपटूंच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी दुसऱया डावात असणार आहे. एका कसोटीत शतक आणि दहा बळी गारद करणाऱया खेळाडूंच्या यादीत इयान बॉथम, इम्रान खान व शाकीब उल हसन हे तिघेच आहेत. रविचंद्रन अश्विनने दुसऱया डावात इंग्लंडचे पाच बळी गारद केल्यास त्याचाही या यादीत समावेश होऊ शकतो.
तिसराच हिंदुस्थानी
एका कसोटीत पाच बळी व शतक साजरे करणारा रविचंद्रन अश्विन हा तिसराच हिंदुस्थानी क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी विनू मंकड आणि पॉली उम्रीगर यांनी ही करामत करून दाखवली आहे.
आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिसरे शतक
रविचंद्रन अश्विनने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन तिसरे शतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो दुसराच फलंदाज आहे. याआधी न्यूझीलंडच्या डॅनियल व्हेट्टोरीने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन चार शतके झळकाविली आहेत. डॅनियल व्हेट्टोरीने 9व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन एक शतक झळकावले आहे.
























































