
स्वतःच्याच गोठवलेल्या वीर्यातून आता गुजरातमधील एक महिला आई होण्याच्या तयारीला लागली आहे. डॉ. जेसनूर दायारा असं या महिलेचं नाव आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. जेसनूर दायारा ही महिला गुजरामधील पहिली ट्रान्सवुमन (लिंगबदल केलेली) डॉक्टर आहे. तिने रशियातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आहे. मूळची पंचमहलच्या गोध्रा या गावची असलेल्या जेसनूर हिने तिचं बालपण मुलगा म्हणून व्यतित केलं.

जेसनूरच्या म्हणण्यानुसार, लहानपणापासून पुरुषाच्या शरीरात अडकून पडल्यासारखं वाटत होतं. जेसनूर लहान असताना आपल्या आईची साडी नेसणं किंवा मेकअप करणं अशा गोष्टी करत असे. पण, तिला सतत या गोष्टीची भीती होती की आपण पकडले जाऊ नये. शिक्षणासाठी परदेशी गेल्यानंतर मात्र जेसनूर हिने स्त्री होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला होणारा विरोध मावळून तिच्या कुटुंबीयांनी आणि मग समाजानेही तिला स्वीकारलं.
आता जेसनूर मेडिकल काऊन्सिलच्या परीक्षेची तयारी करत असून त्या परीक्षेनंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर ती एक महिला म्हणून समाजात वावरू शकेल. पण, त्यापूर्वी तिने एक निर्णय घेतला आहे. तिला महिला झाल्यानंतर आई होण्याची इच्छा असल्याने तिने आधीच स्वतःचं वीर्य गोठवण्यासाठी दिलं आहे.
आणंद येथील एका फर्टिलिटी क्लिनिकमध्ये ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. आता स्त्रीबीज आणि गर्भाशयाच्या मदतीने तिला मूल जन्माला घालणं शक्य होणार आहे. मात्र, यासाठी तिला सरोगसी हा पर्याय निवडावा लागणार आहे.
मात्र, इथेही काहीशी अडचण असल्याचं चित्र आहे. लोकसभेत 2019मध्ये सरोगसी कायद्यासंबंधी एक विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यात अविवाहित पुरुष, एलजीबीटीक्यू जोडपं किंवा लिव्ह इन नात्यातील जोडप्याला सरोगसीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. अद्याप हे विधेयक राज्यसभा आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यामुळे जेसनूरला आता सरोगसीसाठी देशाबाहेरचे पर्याय निवडावे लागणार आहेत. मात्र, आई होण्यासाठी आपण तेही करायला तयार असल्याचं तिचं म्हणणं आहे.





























































