
पालम तालुक्यात झालेल्या अपल्शः पावसानंतर पालम तालुक्यातील केरवाडी ते सिरपूर रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. काल पडलेल्या पावसानंतर दुचाकी फसण्याचे प्रमाण वाढले असून पायी चालणे देखील कठीण होऊन बसले आले.
परिणामी, रस्त्यावरील चिखल वाळेपर्यंत वाहतूक बंद झाल्याने सिरपूरसह अन्य 6 गावांतील ग्रामस्थांचा पालमशी संपर्क तुटला आहे. हा प्रश्न कायमचा बनला असला तरीही प्रशासन किंवा लोकप्रतिनीधी, याकडे बघण्यास तयार नाहीत.
20 वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. तदनंतर साधे गिट्टीचे टीपर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला किंवा एखाद्या लोकप्रतिनीधीला घडले नाही. म्हणून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली. सध्या रस्त्यावर डांबर शिल्लक राहिलेले नाही. रस्ता मातीच्या थराला लागला. जागोजागी पाणी साचत असून तिथे चिखल तयार होत आहे. तो 2-2 दिवस वाळत नाही. तोपर्यंत वाहतूक ठप्प होते. पायी देखील चालता येत नाही. वाहने तर दुरचीच बाब राहिली. तरीही वाहने नेण्याचा प्रयत्न केल्यास ते फसून बसत आहेत. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
19 फेब्रुवारी 2021 रोजी पालम तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने हा रस्ता बंद झाला. तो आज शनिवारपर्यंत सुरू होऊ शकला नाही. झालेल्या पावसाळ्यात या समस्येला सिरपूरसह 6 गावातीत ग्रामस्थ तोंड देऊन वैतागले आहेत. त्यात सिरपूर पलिकडील सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडी, रावराजूर, रोकडेवाडी गावचा समावेश आहे. रस्त्यासाठी अनेकवेळा निवेदने, विनंत्या केल्या. तरीही त्याकडे साफ दुर्लक्ष केलं जातं.
जिल्हा परिषद ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकीपूर्वी रस्ता डांबरीकरणाचे आश्वासन सर्व उमेदवारांकडून दिल्या जाते आणि निवडणुका आटोपल्या की लोकप्रतिनीधी गावाकडे फिरकत सुद्धा नाहीत. आगामी पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरूस्त झाला नसल्यास वाहतुकीसाठी ग्रामस्थांना हिवाळ्याची वाट पाहवी लागणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेला जाता येणार नाही.
शेतमाल बाजाराला नेता येणार नाही आणि खते, बी-बियाणे गावाकडे आणता आणता येणार नाहीत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरूस्त करवा, त्याचे डांबरीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

























































