ठार मारण्याची धमकी देत 20 लाखांच्या खंडणीची मागणी; आरोपीला रंगेहात अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यास फोन करून ठार मारण्याची धमकी देत 20 लाखांची खंडणी घेणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने रंगेहात पकडले. सागर दत्तात्रय फडतरे (वय 29, रा. बोपगाव, पुरंदर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार कोंढवा परिसरात जमीन खरेदी-विक्रीचे व्यावसायिक आहेत. काही दिवसांपूर्वी एकाने त्यांना फोन करून तुमची 50 लाख रूपयांची सुपारी मिळाली आहे. जीव वाचवायचा असल्यास 20 लाख रूपये खंडणीची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पथकाने 19 फेब्रुवारीला तक्रारदाराच्या कार्यालयात सापळा रचत 20 लाखांची खंडणी घेणाऱ्या सागरला रंगेहात पकडले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, विनोद साळुंके, प्रदीप शितोळे, राहूल उत्तरकर, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ यांच्या पथकाने केली.