
धावत्या पीएमपीएल बसने अचानक पेट घेतल्यामुळे लागलेल्या आगीत एक प्रवाशी जखमी झाल्याची घटना खराडी बायपास चौकात घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि विमानतळ पोलिसांनी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती विमानतळ पोलिसांनी दिली आहे.
आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पीएमपीएल बस काही प्रवाशांना घेऊन खराडी बायपास चौकातून पुढे जात होती. त्यावेळी इंजीन मधून अचानक धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान दाखवून बस थांबवली. तोपर्यंत बसने पेट घेतला. त्यामुळे एक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती विमानतळ पोलिसांनी दिली आहे.
बसचा स्फोट होईल या भीतीने घाबरून प्रवाशांनी दूर पळ काढला होता. दरम्यान, आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत आहेत.


























































