रत्नागिरीतही संचारबंदी लागू! लग्न, समारंभ, उत्सवासाठी घ्यावी लागणार परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज जाहिर केला.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहिर केलेल्या आदेशात्मक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होत असणाऱ्या विविध क्रिडा स्पर्धा उदा. कबड्डी, क्रिकेट, खो-खो, इ. यांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या पुर्वपरवानगी शिवाय भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक प्राधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय आठवडे बाजार, जनावरांचे बाजार भरवता येणार नाहीत.कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक, धार्मिक समारंभ साखरपुडा, मुंज, पुजा, आरती, नमाज इत्यादी ज्यामध्ये 50 च्या मर्यादेपर्यंत लोक एकत्रित येण्याची शक्यता आहे अशा कार्यक्रमांना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव

उद्याने, मोकळया जागा, मनोरंजन पार्क, क्रिडांगणे, समुद्र किनारे अशा ठिकाणी एकाच वेळी 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास या आदेशाव्दारे मज्जाव करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे अटी शर्तींवर खुली करणेस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा, जत्रा, ऊरुस भरविण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज प्राप्त होत आहेत असे निदर्शनास आले आहे. तथापि या कामी रत्नागिरी जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, यात्रा, जत्रा, ऊरुस यांमधील फक्त धार्मिक विधी करण्यास 50 माणसांच्या मर्यादेत परवानगी देण्यात येत असून त्याकरीता उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

तसेच जिल्ह्यात विनापरवाना जत्रा, यात्रा, ऊरुस भरविणेस मनाई करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत रात्री 09.00 ते सकाळी 05.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरीता नेमण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी व वैदयकीय कारणास्तव रुग्ण व त्याच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

दंडात्मक रक्कमेचा वापर कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी!

केवळ मास्क जवळ बाळगून त्याचा वापर न करणे, किंवा योग्य रितीने वापर न वापणे या बाबी सुध्दा मास्कचा वापर न करणे या प्रमाणे समजण्यात येईल.मास्क न वापरणारे यांचे विरुध्द 500/- रुपये दंड आणी प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई करणेत येईल.मास्क न वापरणारे यांचे विरुध्द दंडात्मक कारवाई करणेसाठी स्थानिक प्रशासन नगरपंचायत-नगरपरिषद/ ग्रामपंचायत)तसेच पोलीस प्रशासन यांना सक्षम प्राधिकारी म्हणून या आदेशान्वये प्राधिकृत करण्यात आले आहेत.प्रशासनाकडून आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही त्यांच्याकडील खात्यात जमा करावयाची आहे. नगरपंचायत / नगरपरिषद प्रशासनाकडून आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही त्यांच्याकडील खात्यात जमा करावयाची आहे. ग्रामपंचायत आणि नगरपंचायत / नगरपरिषद प्रशासनाने दंडातून प्राप्त झालेल्या निधीचा वापर कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी करावयाचा आहे. पोलीसप्रशासनाकडून आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही वाहतुक शाखेच्या खात्यात जमा करावयाची आहे व जमा रकमेपैकी 50 टक्के निधी हा District Disaster Response Fund, State Bank Of India, A/C No. 38263416984, IFSC Code – SBIN0000462 या जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांचेकडील खात्यात जमा करावयाचा आहे.हे सर्व आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रात दिनांक 22/02/2021 रोजी मध्यरात्री 12.00 वा.पासून ते या कार्यालयाचे पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.