ना टाळ-मृदंगाचा निनाद…ना हरिनामाचा जयघोष, पंढरपुरातील माघीवारी प्रातिनिधिक स्वरूपात साजरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याने माघी वारीचा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करण्यात आला. प्रथेप्रमाणे पहाटेची श्री विठ्ठल-रखुमाईची महापूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि माधवी निगडे यांच्या हस्ते करण्यात आली. चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणामार्ग व नेहमी गजबजलेला मंदिर परिसर आज भाविकांविना ओस पडला होता. सर्वत्र भाविकांऐवजी बंदोबस्ताकरिता उभे असलेले पोलीस दिसत होते.

कोरोनाच्या सावटामुळे माघी वारीही वैष्णवांविनाच साजरी झाली. जया शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. त्याचबरोबर नेत्रदिपक विद्युतरोषणाईही करण्यात आल्याने मंदिर उजाळून निघाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. संचारबंदी असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्यात आले होते.

शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात आली आहे. भाविक तर सोडाच, शहरातील नागरिकही घराबाहेर पडल्याचे दिसले नाही. ठिकठिकाणी रस्त्यावर बॅरिकेडिंग करून रस्ते अडविण्यात आले आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱया नागरिकांवर पोलिसी कारवाई करण्यात येत आहे.

प्रदक्षिणा मार्गावर प्रातिनिधिक दिंडी

नेहमी भाविकांनी गजबजलेली पंढरीदेखील ऐन माघी यात्रा एकादशीदिवशी सुनीसुनी भासत आहे. नेहमीप्रमाणे मठ, धार्मिक संस्थाने यांमध्ये सुरू असणारा हरिनामाचा जयघोष कानी पडला नाही. तसेच टाळ-मृदंगांचा आवाजही आला नाही. प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या वारकऱयांनी प्रदक्षिणामार्गावर दिंडी काढून वारी पोहोचती केली.

मंदिर उद्याही बंद

संचारबंदी उठल्यानंतर आज बुधवारी किमान द्वादशीला तरी श्री विठ्ठलाचे दर्शन मिळेल, अशी आशा भाविकांना होती. मात्र, द्वादशीलादेखील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन कोरोनामुळे दुरावणार आहे.