कार्यालयांची तोडफोड, मारहाण झाल्यास फौजदारी,  महावितरणाचा इशारा; दहा वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ-दहा महिन्यांपासून थकबाकी असलेल्या वीज बिलवसुलीसाठी सध्या महावितरणकडून धडाका सुरू आहे. मात्र, याला ठिकठिकाणी विरोध होत आहे. इचलकरंजी येथे महावितरणच्या कार्यालयावर झालेला हल्ला आणि कर्मचाऱयांना जखमी करण्यात आल्याने महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. त्यानुसार आता महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱयांना शिवीगाळ, मारहाण, तसेच कार्यालयांची तोडफोड केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. यातील दोषींना दोन ते दहा वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करण्यात यावे, यासाठी कोल्हापूरसह अन्य जिह्यांतील जनआंदोलने, तसेच वीज तोडल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, गेल्या आठ-दहा महिन्यांपासून थकबाकी असलेल्या वीज बिलवसुलीस महावितरणने सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत चार हजारांहून अधिकजणांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. काही ठिकाणी नागरिकांचा विरोध होत आहे. इचलकरंजी येथे तर महावितरणच्या कार्यालयावर हल्ला होऊन कर्मचाऱयांनाही गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 10 ते 15 जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, यापुढे महावितरणचे अभियंता, कर्मचाऱयांना मारहाण वा कार्यालयाची तोडफोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. असा प्रकार घडल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.

इचलकरंजीतील हल्लेखोरांना कोठडी

इचलकंरजी येथील महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड व कर्मचाऱयांना मारहाण केल्याप्रकरणी गजानन जाधव यांच्यासह 10 ते 15 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक केलेल्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मारहाण झालेल्या अभियंता व कर्मचाऱयांशी मोबाईलद्वारे थेट संवाद साधून त्यांची विचारपूस करीत मनोधैर्य वाढविले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात 1771 कोटींची थकबाकी

पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली जिह्यांत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा 27 लाख 11 हजार वीज ग्राहकांकडे सध्या एक हजार 771 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर, 13 लाख 86 हजार ग्राहकांनी एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या सलग 10 महिन्यांत एकही वीज बिल भरलेले नव्हते. तरीही 31 जानेवारी 2021पर्यंत थकबाकीसाठी एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नाही. आता नाइलाजाने 1 फेब्रुवारीपासून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. थकबाकी भरण्यासाठी चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वीज बिलांबाबत तक्रार निवारणासाठी सर्व कार्यालयांत सेवा उपलब्ध आहे.