
परभणीमधील पाथरी येथील एकता नगरातील एका जीममधून पोलिसांच्या एका पथकाने बुधवारी पहाटे सिल्व्हर रंगाची पिस्तूल जप्त केली. मंगळवारी परभणी शहरातून 2 पिस्तूल तर त्यापाठोपाठ पाथरीतून अवघ्या काही तासांतच आणखी एक पिस्तूल जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांचे एक पथक पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्या पथकास एक गुप्त माहिती कळाली. सय्यद चाऊस मोहमद चाऊस (रा. अजीज मोहल्ला, पाथरी) ही व्यक्ती विनापरवाना बेकायशीरपणे पिस्तूल बाळगून असल्याचे कळल्याबरोबर या पथकाने बुधवारी पहाटे 5 वाजता चाऊस याच्या अजीज मोहल्यातील घरावर छापा टाकला.
त्या 26 वर्षीय युवकास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने एकात नगरातील त्याच्या मालकीच्या जीममध्ये पिस्तूल ठेवल्याची माहिती दिली. पथकाने तातडीने जीममध्ये जात तेथील सिल्व्हर रंगाचे पिस्तूल जप्त केले. एकूण या पथकाने केलेल्या चौकशीतून त्याने ते पिस्टल परभणीतून एका व्यक्तीकडून खरेदी केल्याचे म्हटले. या प्रकरणी त्यासह अन्य एका व्यक्तीविरूध्द पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 40 हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, हनुमंत जक्केवाड, शंकर गायकवाड, अजहर पटेल, संतोष सानप, विष्णू भिसे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.























































