मंत्रालयात कर्मचाऱ्यांना एक दिवसआड काम! कोरोना रोखण्यासाठी मुख्य सचिवांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mantralay

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम तसेच शिफ्ट डय़ुटी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तत्काळ पावले उचलत मुख्य सचिव संजय कुमार यांनी मंत्रालयात सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना विविध विभागांना दिल्या आहेत. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास विभागा, एक दिवसआड, तीन-तीन दिवस किंवा एक-एक आठवडय़ाच्या शिफ्टनुसार बोलवा, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मंत्रालयात 25 टक्के, त्यानंतर 50 टक्के आणि प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 100 टक्के उपस्थिती लागू करण्यात आली होती. मात्र मुंबई तसेच महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यातच मंत्रालयात वाढलेल्या वर्दळीमुळे महसूल विभाग, शिक्षण विभागात 35हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्याचप्रमाणे गर्दी कमी करण्यासाठी कामाच्या वेळा बदलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले.

सोशल डिस्टंसिंगसाठी उपाययोजना करा!

मंत्रालयात कोणत्याही परिस्थितीत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन व्हायलाच हवे. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याबाबत विभागांनी निर्णय घ्यावा.  त्याचप्रमाणे जर सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतही सोशल डिस्टंसिंगच्या सर्व उपाययोजना, कोरोनाचे सर्व नियम पाळून काम करता येत असेल तर त्याबाबतही विचार करावा, अशा सूचना मुख्य सचिवांनी दिल्या आहेत.

पोलिसांच्या कामाच्या वेळा बदलल्या

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनीदेखील आपल्या कार्यालयीन कामांच्या वेळामध्ये बदल केला आहे. महाराष्ट्र पोलीस मुख्यालयातून जारी केलेल्या पत्रकानुसार गट-अ व गट-ब संवर्गातील  अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती अनिर्वाय असेल. तर मुख्यालयात कार्यरत गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. दरम्यान, त्यापैकी 25 टक्के कर्मचाऱ्यांना सकाळी 9 ते दुपारी 4 आणि उर्वरित 25 टक्के कर्मचाऱ्यांना सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत कामकाजासाठी बोलावण्यात आले आहे. तर उर्वरित 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र त्यांना फोनवर उपलब्ध राहावे लागणार आहे. शिवाय गरज भासल्यास त्यांना कार्यालयात बोलावले जाईल.