
अहमदपूर तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र बऱ्याच प्रमाणात वाढले आहे. त्यामूळे ऊसाचे क्षेत्रही वाढले आहे. ऊसलागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा ओढा साखर कारखान्याला ऊस देण्याकडे जास्त दिसून येत आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपूर्वी दिसून येणारी ऊसाच्या गुऱ्हाळ्यांची संख्या कमी होत आहे. आता बोटांवर मोजण्याइतकेच गुऱ्हाळे शिल्लक आहेत.
अहमदपूर तालुक्यात जलस्रोतांची संख्या वाढली असल्यामुळे सिंचनाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तालुक्यात ऊसाचे प्रमाण इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. ऊसाचे क्षेत्र आहे तेथील बहुतांश शेतकरी वाढत्या कारखानदारीमुळे जिथे दर जास्त तेथील साखर कारखान्याला ऊस पाठवतात. मागील काही वर्षांपासून ऊसाच्या रसवंत्या सर्वत्र उभारल्या जात आहेत. त्यामुळे रसवंती चालकांकडूनही ऊसाची मोठी मागणी होत आहे. त्यामुळे ऊसतोडणीला आल्यावर जागोजागी ऊसाच्या रसापासून गूळ तयार करणारे गुऱ्हाळ मांडले जात होते. गुऱ्हाळाचा आस्वाद घेण्यासाठी शेतकरी आपल्या पाहुण्यांना आमंत्रित करीत होते.
या गुऱ्हाळाची एक वेगळीच लगबग पाहावयास मिळत होती. एकीकडे मजुरांची सुरू असलेली ऊसतोडणी, दुसरीकडे चरकातून काढण्यात येणारा ऊसाचा रस, बाजूलाच पेटवलेली भट्टी, त्यात टाकण्यात येणारे पाचट, भट्टीवर लावण्यात आलेली भलीमोठी लोखंडी कढई, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुऱ्हाळाचे धुराडे कलईमधील ऊसाचा रसाची होणारी वाफ तुरळक ठिकाणी पाहवयास मिळत आहे. त्यात ऊसाचा रस आणि गूळ भेंडी ओतून अगदी उकळी फुटेपर्यंत कवच्याने हलवत ठेवावी लागते. ऊसाच्या रसाच्या आधणाने कढईत उकळी घेतली की गूळाचा पाक तयार होतो. हा उकळता पाक हौदात ओतण्यापूर्वी त्यावरील काईली काढण्यात येते. ही काईली अनेक रोगांवर औषधाचे काम करते.
कुठलीही कृत्रिम अथवा रासायनिक प्रक्रिया न केलेला शुद्ध गावरान गूळ साच्यात तयार करण्यात येतो. त्यानंतर हौदात ओतलेल्या गुळाच्या पाकाला थंड होण्यासाठी सातत्याने कवच्याने वर-खाली करत राहावे लागते. पाक काहीसा घट्ट होत चालला की त्याला मग एक, दोन, पाच, दहा व बारा किलोच्या साच्यात टाकण्यात येते. साच्यात गूळ घट्ट झाला म्हणजे ती गुळाची ढेप तयार झाली. यानंतर हा गूळ बाजारात विक्रीसाठी तयार होतो. असेच ऊसाचे गुऱ्हाळ सध्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती शिवारात सुरू आहे.
शेतकऱ्यांना ऊस लागवड केल्यानंतर एका एकरमध्ये मध्ये 25 आधणन निघत असून एका आधणाला अडीच क्विंटल गूळ निघतो. तर एकरी सहा टन 2.50 किलो गूळ निघतो. त्याचे बाजार मूल्य 3000 क्विंटल असून 187000 हजार रुपये होतात. याचा एका आधणाला 2000 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्यापेक्षा गुऱ्हाळ परवडतात. मात्र, शेतकरी गुळाचे उत्पन्न न घेता साखर कारखान्याला ऊस देऊन मोकळे होत आहेत.
महिला शेतकरी शिवाबाई केदारलिंग हेंगणे म्हणाल्या की, ऊस तोडणीसह गुऱ्हाळाच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत. एकदा गुऱ्हाळ सुरू झाल्यावर ते बंद होऊ नये म्हणून मजुरी व्यतिरिक्त आगाऊ रक्कम मजुरांना द्यावी लागते. गुऱ्हाळात तयार होणारा गूळ शुद्ध असतो. त्यात कोणतीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे अशा गुळाला मोठी मागणी आहे. मात्र, गुऱ्हाळांची संख्या रोडावल्याने बाजारात गुळाची विक्री कमी होत आहे, असे हेंगणे यांनी सांगितले.
























































