कुटुंबीय पॉझिटिव्ह असूनही जिमखान्यात जाणाऱया व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना पॉझिटिव्ह मुलगी आणि आई-वडिलांना घरातच 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आलेले असताना पित्याने जिमखान्यात जात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात पालिकेने आज गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मुंबईतील ही दुसरी घटना आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण प्न्हा काही प्रमाणात वाढल्यामुळे मुंबई महापालिकेने कोरोनाचे नियम अधिक कठोर केले असून विनामास्क फिरणाऱया तसेच क्वारंटाइनचे नियम न पाळणाऱया व्यक्ती आणि सोसायटींविरोधात कारवाई सुरू आहे. चेंबूरच्या गंगा इस्टेट, अतुर पार्क येथे राहणारी 20 वर्षांची मुलगी 17 फेब्रुवारीला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिच्यात कोरोनाची लक्षणे नव्हती, मात्र तिच्यापासून तिच्या आई आणि वडील अशा दोघांनाही कोरोना झाल्याचे 19 फेब्रुवारीला केलेल्या चाचणीत आढळले. महापालिकेच्या एम-पश्चिम विभागातील कर्मचाऱयांनी मुलीसह कुटुंबीयांना घरातच 14 दिवस क्वारंटाइन राहण्याची सूचना केली. या कुटुंबीयांनी हातावर क्वारंटाइनचे स्टॅम्प मारण्यास नकार दिला. पित्याने परिसरातील जिमखाना क्लब येथे जात क्वारंटाइनचे नियम तोडले. या घटनेची माहिती सोसायटी सदस्यांनी पालिका अधिकाऱयांना दिली. याची त्या व्यक्तीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी आणि शहानिशा केली असता ही व्यक्ती वारंवार घराबाहेर गेल्याचे आढळले. याची गंभीर दखल घेत पालिकेने क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन करणाऱया पित्याविरोधात आज गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कांदिवलीत इमारतीचा मजला सील केला असताना त्याच मजल्यावर राहणाऱया महिलेने क्वारंटाइनचे नियम तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

क्वारंटाइनचे नियम तोडणाऱया व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर अशा व्यक्तींना एकाच वेळी दंड तसेच कमीत कमी एक महिना कारावासाची शिक्षा होऊ शकते. मात्र असे असूनही मुंबईकर कोरोनाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मुंबईकरांच्या अशा बेजबाबदार वृत्तीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. – पृथ्वीराज चौहान, सहाय्यक आयुक्त, एम-पश्चिम