अयोध्येला भरभरून दान, राममंदिर उभारणीसाठी जमले 2100 कोटी रुपये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येतील भव्य मंदिर उभारणीसाठी दानशूर व्यक्तींनी भरभरून दान केले आहे. मागील 44 दिवसांत राबवण्यात आलेल्या मंदिर निधीसंकलन अभियानात तब्बल 2100 कोटी रुपये जमा झाले. अभियानात साधारण 1100 कोटी रुपयांचा निधी जमेल, असा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र दानशूर व्यक्तींच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे जवळपास दुप्पट रक्कम जमा झाली आहे.

विश्व हिंदू परिषदेने 15 जानेवारीला निधीसंकलन अभियान सुरू केले होते. हे अभियान 44 दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ज्या राज्यांमध्ये अभियानाची उशिराने सुरुवात झाली त्या राज्यांमध्ये अजूनही दान स्वीकारले जात आहे. त्यामुळे मदत निधीची रक्कम आणखी वाढणार आहे. मंदिर उभारणीवर 1500 कोटी रुपये खर्च होतील, असा सध्याचा अंदाज आहे. प्लॅनमध्ये काही बदल झाल्यामुळे मंदिर उभारणीचा खर्च वाढला आहे. भविष्यात नव्या योजनांमुळे खर्च आणखी वाढू शकतो. त्या पार्श्वभूमीवर आवश्यकता भासल्यास पुन्हा निधीसंकलन अभियान राबवले जाऊ शकते, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितले.

विदेशातून मदतीचा ओघ; मुस्लिम धर्मीयही सरसावले

श्री प्रभू रामचंद्र यांचे भव्य मंदिर उभारताना पुठेही निधी कमी पडू नये यासाठी विदेशातून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. विदेशातील अनेक लोक मंदिरासाठी दान करण्यास तयार आहेत. हे लोक विदेशात निधीसंकलन अभियान राबवण्याची मागणी करीत आहेत. त्यांच्याकडून कशा प्रकारे निधी स्वीकारायचा याचा निर्णय मंदिर ट्रस्ट पदाधिकाऱयांच्या बैठकीत घेतला जाईल. मुस्लिमधर्मीयही मदतीसाठी स्वेच्छेने पुढाकार घेत आहेत, असे स्वामी गोविंद देव गिरी यांनी स्पष्ट केले.