
भाजप इतका मोठा पक्ष आहे, सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन बंगालमध्ये आला आहे. पण बोहल्याकर बसणारा नवरा कोण? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या एका तरी नेत्याचे नाव सांगून दाखवा, असे म्हणत राजद नेते तेजस्वी यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगाल दौऱयावर असलेले राजद नेते तेजस्वी यादव यांनी नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा एकही उमेदवार नाही. ज्यांना विधानसभेचा अनुभवच नाही त्यांच्याकडे तुम्ही सत्ता सोपवणार का, असा प्रश्न केला आहे. दरम्यान, तेजस्वी यादव यांनी तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन चर्चा केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी राजद तृणमूल काँग्रेससोबत गठबंधन करणार असल्याची चर्चा आहे.
























































