
कोरोनामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या ऑनलाइन वर्गात मराठी राजभाषा दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता तिसरीच्या ऑनलाइन वर्गात मराठी भाषेचा गौरव करण्यात आला. ‘गुजगोष्टी पुस्तकातील व्यक्तींशी’ या सदरात आतापर्यंत विद्यार्थ्यांनी ज्यांची नावे, कविता, धडे पुस्तकात वाचली, अशा प्रसिद्ध लेखक व कवींशी ऑनलाइन कार्यक्रमात संवाद साधला.
मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ कथाकार व कवी जयवंत पाटील, प्रगल्भ कवी व निवेदक संजय गवांदे, शब्दप्रभू बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड व मराठी ज्ञानकोशकार व्यासंगी लेखिका विजया वाड यांनी आपल्या कथा, कविता व स्वानुभव सादर केले. साहित्यिकांशी मुलांनी दिलखुलास गप्पा मारल्या. आपल्या बाळबोध प्रश्नांनी त्यांनाही हसविले. साधारणपणे पावणेतीन तास चाललेल्या या मराठीमय मंगल व स्वर्गीय आनंदयात्रेत सर्वांना समाधी लागली. अविस्मरणीय अशा या कार्यक्रमात 300 विद्यार्थी व शिक्षक महाराष्ट्रातील विविध भागांतून ऑनलाइन साक्षीदार झाले. ज्यांना या कार्यक्रमात सामील होता आले नाही ते यूटय़ूबच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहेत.
उपशिक्षणाधिकारी संजीवनी कापसे, ऑनलाइन शिक्षण विभागप्रमुख प्रीती पाटील, शोभा जामघरे यांनीही मुलांशी संवाद साधला. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्या कदम व संध्या भोसले यांनी रचलेल्या राजभाषा मराठी या गीताला स्वर व संगीतमय करून शुभांगी मेमाणे यांनी सादर केले. त्याला स्पृहा इंदू यांनी चित्ररूप दिले. या कार्यक्रमाला संध्या भणगे व भरत पाटील यांनी निवेदनाची झालर लावली. आभाराचा भार माधुरी आलीम यांनी घेतला. उत्कृष्ट नियोजन व उत्तम सादरीकरण अर्थातच ऑनलाइन रजनी आव्हाड व सीएनओ कविता महाले यांचे होते.
































































