उमेद – भास्करच्या जीवनात झाला अरुणोदय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ममता क्षेमकल्याणी

परावलंबन आणि निरुपयोगिता या दोन्ही भावना नैराश्याला पोषक असतात. त्यामुळेच अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्यातील उपयोगितेला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण काम ईडार्चमध्ये केले जाते. ईडार्चच्या या सूत्रातून स्वावलंबी झालेल्या भास्करच्या जीवनात खऱया अर्थाने अरुणोदय झाला. त्या भास्कर माधव साळुंखे या युवकाची ही यशोगाथा.

माझ्या भास्करला आता काम करायला खूप आवडतं. कामाला सुट्टी असली की, तो खूप अस्वस्थ होतो, पण आता मला त्याची अजिबात काळजी वाटत नाही… असं सांगताना भास्करच्या आई शशिकला माधव साळुंखे त्यांचे पाणावलेले डोळे पुसत होत्या.

गेल्या सुमारे 14 वर्षांपासून भास्कर ईडार्च अर्थात आंत्रपुनरशिप डेव्हलपमेंट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर द हॅन्डिकॅप्डमध्ये येतो आहे आणि या कालावधीत त्याच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वर्तनात अनेक सकारात्मक बदल दिसून आले आहेत. आपला मुलगा सर्वसामान्यांसारखा नाही हे लक्षात आल्यानंतर शशिकला साळुंखे यांना स्वाभाविकपणे धक्का बसला. शाळेतील अभ्यासात तो काही प्रगती करू शकत नाही हे वास्तव स्वीकारून त्यांनी भास्करला विशेष शाळेत घातले. लहानग्या भास्करला स्वतःची अनेक कामे करण्यासाठी आईची मदत घ्यावी लागायची. मात्र, त्याच्या जिद्दी स्वभावामुळे हळूहळू भास्कर आपल्या वैयक्तिक कामात स्वावलंबी झाला. शाळेचे वय सरल्यानंतर मात्र घरी राहत असलेल्या भास्करला रिकामपण खायला उठत असे. आपण काही करत नसल्याच्या भावनेतून होणारी त्याची चिडचिड, आक्रमकता, नैराश्य अशा अनेक प्रश्नांनी भास्करच्या घरातील मंडळी हैराण झाली.

भास्करला नीट चालता, बोलता आणि लिहिता येत नाही, त्यामुळे तो स्वतंत्रपणे काही काम करू शकतो असा विचारदेखील कोणी केलेला नव्हता. मात्र, ईडार्चमध्ये आल्यानंतर भास्करला वेगवेगळ्या प्रकारची कामे शिकायला मिळाली, आपल्यासारखे आणि आपल्यापेक्षा वेगळे अपंगत्व असलेले मित्र मिळाले आणि या सगळ्यातून भास्करचा आत्मविश्वास वाढीस लागला. ईडार्चमध्ये येणारे अंध, अपंग, मतिमंद, मूकबधिर असे विविध प्रकारचे अपंगत्व असलेली मुले एकत्रितपणे उत्तम काम करतात. भास्करला या सगळ्या वातावरणात एक प्रकारचा आपलेपणा जाणवला आणि आज भास्कर त्याचा संपूर्ण दिवस ईडार्चसाठी वाहून घेताना दिसतो. इथे काम करताना त्याच्यामध्ये जबाबदारीची जाणीव झाली. रोज सकाळी सहाला उठून आणि स्वतःचे सगळे आवरून भास्कर साडेआठच्या बसने ईडार्चला येतो. ईडार्चमध्ये मशीनवरील कामांपासून प्रशासकीय कामेही भास्करने शिकून घेतली आहेत. इतकंच नाही, तर इथे तयार होणारे प्लॅस्टिक कम्पोनन्स्ट पॅक करून स्वतः हाताने व्हाऊचर बनवून ते बॉक्स रिक्षाने चाकणला कंपनीमध्ये नेऊन देण्याची जबाबदारीदेखील भास्कर उत्तमपणे पार पाडतो. संस्थेच्या कामानिमित्त बाहेर जाणारा भास्कर तहान-भूक विसरून त्याला सोपवलेली सर्व कामे योग्य प्रकारे मार्गी लावतो. शारीरिक आणि मानसिक कमतरता असलेला भास्कर माणूस म्हणून किती सच्चा, प्रामाणिक आणि कष्टाळू आहे याची प्रचीती त्याला भेटल्यानंतर नक्कीच येते.

ईडार्चचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे यांनी अपंग व्यक्तींमधील दिव्यशक्ती ओळखून त्यांच्यात निर्माण केलेला आत्मविश्वास खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. ते म्हणतात की, ‘‘आपला समाज या मुलांकडे कायमच एका वेगळ्या नजरेने पाहतो. त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतो. त्यामुळे आपण निरुपयोगी आहोत ही भावना या मुलांमध्ये निर्माण होऊन पुढील अनेक प्रश्न आणि प्रश्नांची मालिका तयार होते. मात्र, ईडार्चमध्ये येणारा प्रत्येक मुलगा स्वावलंबी व्हावा असा आमचा उद्देश असल्यामुळे सगळ्यात आधी आम्ही या मुलांच्या क्षमता ओळखून त्याला साजेसे काम करण्यास सांगतो. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन पुढील मार्ग अधिक सुकर होतो.

भास्करच्या बाबतीतदेखील असंच झालं. घरामध्ये काही मोजकी कामे करून उरलेला वेळ रिकामा राहणारा भास्कर चिडचिड आणि आक्रस्ताळेपणा करीत असे, नाहीतर कायम बाहेर फिरत असे, पण त्याने ईडार्चमध्ये यायला सुरुवात केल्यानंतर त्याला आम्ही अनेक गोष्टी शिकवल्या. अगदी वेळ पाळणे, एकमेकांशी नीट बोलणे, नवीन काम शिकण्याची तयारी ठेवणे, प्रयत्नांवर विश्वास ठेवणे अशा छोटय़ा, पण महत्त्वाच्या गोष्टी शिकून भास्कर आज ईडार्चमधील अनेक जबाबदाऱया उत्तमपणे पार पाडतो आहे. लॉक डाऊनच्या काळात तर अनेकदा मला फोन करून त्याने संस्थेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, इतका तो या सगळ्या कामांमध्ये रमून गेला आहे.’’

आज 40 वर्षांचा असलेला भास्कर घरातील झाडलोट, भांडी घासणे, स्वतःचे कपडे धुणे अशी अनेक कामं खूप आवडीने करतो. इतरांना मदत करण्यात त्याला विशेष आनंद मिळतो. त्याच्या दोन्ही पुतण्या म्हणजे त्याचा जीव की प्राण आहेत, असे सांगणारा भास्कर त्यांच्यासाठी नेहमी आठवणीने खाऊ घेऊन जातो.

गेल्या सुमारे 14 वर्षांत भास्करच्या स्वभावात झालेले हे सकारात्मक बदल त्याच्या सगळ्या कुटुंबाला निश्चितच सुखावणारे आहेत. त्याचं हे प्रगतीशील प्रवाही आयुष्य भास्करच्या आईलादेखील मोठा दिलासा देणारं आहे.

‘ईडार्च’ने भास्करप्रमाणेच इतर अनेक अपंगांच्या जीवनात आशेचे दीप उजळवले आहेत. त्यांची यशोगाथा इतरांची उमेद नक्कीच वाढवेल. [email protected], Website : www edarch.org

– [email protected]