प्रवीण अमरे यांचा परिसस्पर्श, पृथ्वी शॉचा कायापालट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला गेल्या आयपीएल मोसमात आणि ऑस्ट्रेलियातील कसोटीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या हिंदुस्थानी संघातून त्याला वगळण्यातही आले. या निराशेला मागे टाकून या पठ्ठय़ाने विजय हजारे ट्रॉफी चार शतकांसह सर्वाधिक 754 धावांचा पाऊस पाडलाय. पृथ्वी शॉच्या फलंदाजीत झालेला कायापालट वाखाणण्याजोगा आहे. याचे श्रेय जाते हिंदुस्थानचे माजी खेळाडू व दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांना. प्रवीण अमरे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच पृथ्वी शॉने पुन्हा एकदा उत्तुंग भरारी घेतली आहे.

100 चेंडू खेळायलाच हवेत

पृथ्वी शॉकडे गुणवत्ता आहे, पण त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येतो. त्यामुळे मी त्याला म्हणालो, आगामी आयपीएल स्पर्धा तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. विजय हजारे ट्रॉफी ही वन डे स्पर्धा आहे. एका डावात 300 चेंडू टाकले जातात. त्याला म्हणालो, तू कमीत कमी 100 चेंडू खेळायलाच हवे, असे प्रवीण अमरे नमूद करतात.

व्हिडीओ पाहून चुकांवर लक्ष

पृथ्वी शॉच्या फलंदाजीचे व्हिडीओ बघितले. त्याच्याकडून कुठे चूक होते आहे हे त्याला दाखवले. फलंदाजी तंत्रातील चुकीमुळे तो वारंवार त्रिफळाचीत व यष्टिरक्षकाकडे झेलबाद होत आहे. आयपीएलमध्येही तो बहुतांशी वेळा पहिल्या पाच षटकांच्या आतच बाद झाला. यावर मी त्याला सांगितले की, आता आपला पूर्ण फोकस सफेद चेंडूसह खेळल्या जाणाऱया क्रिकेटवर असेल, असे प्रवीण अमरे आवर्जून म्हणाले.

ही अखेरची संधी

ऑस्ट्रेलिया दौऱयानंतर पृथ्वी शॉ भावनिकदृष्टय़ा खचला होता. त्यानंतर त्याने माझ्याशी संवाद साधला. मी त्याला सांगितले की, विजय हजारे ट्रॉफी ही तुझ्यासाठी अखेरची संधी असणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यास आयपीएलच्या या मोसमात दिल्ली कॅपिटल्सच्या संघात तुझे स्थान निश्चित असेल, असे प्रवीण अमरे यावेळी म्हणाले.

 शिवाजी पार्कात फिटनेसवर लक्ष

पृथ्वी शॉने या कालावधीत फक्त फलंदाजी तंत्र सुधारण्यावरच लक्ष दिले नाही तर फिटनेसकडेही गांभीर्याने बघितले. प्रवीण अमरे यावेळी म्हणाले, कंडीशनिंग कोच रजनीकांत शिवाजी पार्क येथे सकाळच्या सत्रात दोन तास फिटनेसचा कसून सराव करवून घेत असे. फिटनेसच्या जोरावरच पृथ्वी शॉला विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोठय़ा खेळी करता आल्या आहेत. आयपीएलमध्ये तो सहा षटके खेळपट्टीवर उभा राहत नव्हता. आता तो मोठय़ा शतकी खेळी करतोय, असेही ते पुढे सांगतात.

खेळपट्टीवर जास्त काळ उभे राहण्याचा सल्ला

पृथ्वी शॉ वारंवार त्रिफळाचीत होत होता. फलंदाजी करताना त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये अंतर असायचे. यामुळे मी त्याच्या या फलंदाजी तंत्राकडे लक्ष दिले. जेव्हा खेळाडू सुमार फॉर्ममधून जातो तेव्हा असे होते. मी त्याला म्हणालो जास्तीत जास्त खेळपट्टीवर उभे राहण्याचा प्रयत्न कर.