
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची अखेर मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखा-1 येथे बदली करण्यात आली. आज सायंकाळी वाझे त्यांच्या नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले.
मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख म्हणून सचिन वाझे काम करत होते. दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनात वाझे यांच्यावर विरोधी पक्षाकडून आरोप झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करीत असल्याचे सभागृहात जाहीर केले होते. त्यानुसार वाझे यांची गुन्हे शाखेतून विशेष शाखा-1 येथे पोलीस आयुक्तांनी बदली केली. सचिन वाझे यांनी आज गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचा चार्ज सोडला आणि त्यानंतर ते विशेष शाखा-1 येथे हजर झाले. वाझे आता विशेष शाखेच्या नागरी सुविधा केंद्रात काम करतील.


























































