
>> आशुतोष बापट
ओडिशाला नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बरोबर अजून एका गोष्टीचे वरदान मिळालेले आहे आणि ते म्हणजे इथे बहरलेली हस्तकला. ओडिशाच्या हस्तकलेला खरोखरच तोड नाही आणि ही हस्तकला देवाची सेवा म्हणून केली जाते. त्यामुळे त्यात जीव ओतून काम केलेले दिसते. एखादी वस्तू, एखादी सेवा ही जेव्हा भगवंताला अर्पण करण्याच्या उद्देशाने केली जाते तेव्हा त्या कलेला एक निराळीच उंची प्राप्त होते. पिपली कला हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होय.
ओडिशाच्या लोकांचे आयुष्य भगवान जगन्नाथाशी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जोडले गेलेले आहे. श्रीजगन्नाथ हा ओडिशाच्या जनजीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. पिपली कला जी उदयाला आली ती या जगन्नाथाच्या सेवेसाठीच! जगन्नाथाच्या रथयात्रेच्या वेळी रथावर जे कापडी आच्छादन असते ते याच पिपलीच्या कलाकारांनी तयार केलेले होय. यातूनच बहरली इथली कला आणि त्या कलेच्या विविध छटा आता आपल्याला प्रत्यक्ष इथे पाहता येतात. पुरी आणि भुवनेश्वरपासून जवळच असलेले हे पिपली गाव तिथे असलेल्या ऑप्लिक आर्टसाठी जगप्रसिद्ध आहे. ही कला म्हणजे कापडावर केलेले पॅचवर्प होय. स्थानिक भाषेत याला ‘चंदुआ’ असे म्हणतात.
ऑप्लिक ही एक फ्रेंच कला आहे. ज्यामध्ये कापडाचे विविधरंगी तुकडे कापले जातात आणि ते दुसऱया एका मोठय़ा कापडावर शिवले जातात. अशा पद्धतीने मोठी रंगसंगती इथे साधली जाते. विविध रंगांचे आणि विविध आकाराचे कापडाचे तुकडे एकमेकाशेजारी ठेवून ते एका मोठय़ा कापडावर शिवणे म्हणजे ऑप्लिक वर्क होय. कपडे फाटल्यावर ते शिवण्याची गरज पडू लागली. त्यावेळी कपडय़ाचा फाटलेला भाग हा दुसऱया कापडाच्या तुकडय़ाने झाकण्याची किंवा त्या फाटलेल्या भागावर दुसऱया कापडाचा तुकडा शिवणे अशा गरजेतून या कलेचा जन्म झाला आणि मग त्यानंतर एक मोठय़ा कपडय़ावर मुद्दाम विविधरंगी, विविध आकाराचे तुकडे शिवणे यालाच पुढे ऑप्लिक वर्प म्हणू लागले. पुढे तर ती गरज संपून त्याचे रूपांतर एका सुंदर हस्तकलेमध्ये झाले. ती हस्तकला म्हणजेच आज आपल्याला दिसते ती पिपली आर्ट ! या कलेमध्ये आता विविध प्रकार उदयाला आलेत. कापडाचे छोटे छोटे तुकडे, आरसे तसेच इतर रंगीबेरंगी कापडी तुकडे हे एकत्रपणे दुसऱया मोठय़ा कापडावर सुईने शिवले जातात. त्यावर एम्ब्रॉयडरी केली जाते आणि मग त्यातून जन्माला येते एक सुंदर असे नक्षीदार कापड. इथे डिझायनिंगच्या कामात स्त्र्ायांचा मोठा सहभाग या कलेमध्ये आणि वस्तूंमध्येसुद्धा मोठय़ा प्रमाणात विविधता आली आहे.
पिपलीच्या कलेला जगभरातून मोठी मागणी आहे. त्यात सर्वात जास्त विक्री होणारी वस्तू म्हणजे दिव्याच्या शेडस्. त्या तयार करताना त्याचे डिझाइन करताना इथे विशेष लक्ष दिले जाते. त्याचे आकार आणि त्यावर वापरल्या जाणाऱया गोष्टी या नेहमी नवनवीन असतात. आरसे, एम्ब्रॉयडरी यासोबतच नवनवीन नक्षी आणि कापडाची रंगसंगती जगभरच्या लोकांना सदैव आकर्षित करत आलेली आहे. नुसत्या या शेड्सचे हजारो प्रकार पिपलीला पाहायला मिळतात. अतिशय नजाकतीने तयार केलेल्या या लँपशेड्स आणि त्याचे विविध रंग आपल्याला खिळवून ठेवतात.
इ.स. च्या 11 व्या शतकापासून ही कला दिसू लागते. ओडिशाचे तत्कालीन राजे यांनी हे कलाकार आपल्या पदरी ठेवले आणि त्यांच्याकडून ही कला करवून घेतली. मुख्यत्वे जगन्नाथाची सेवा म्हणूनच ही कला सादर केली जायची. रथयात्रेच्या वेळी तीनही देवांचे रथ विविधरंगी कापडांनी सजवलेले असतात. हे कापड पिपली इथलेच असते. अत्यंत मनोहारी आणि विविध चित्रांनी युक्त असे हे कापड असल्यामुळे रथयात्रा लांबून पाहिली तर खूपच आकर्षक दिसते. तीन रथांना तीन वेगवेगळ्या रंगाची कापडे, त्यावर असलेली रंगसंगती आणि त्यावर केलेले नक्षीकाम पाहण्याजोगे असते. त्याचबरोबर देवाची झालर, अब्दागिरी, चवरी इत्यादी वस्तूसुद्धा पिपलीच्या कलाकारांकडूनच तयार केल्या जातात. निसर्गाशी खूपच जवळीक असलेली ही कला असल्यामुळे निसर्गातील अनेकविध गोष्टींचे प्रतिबिंब या कलेवर पडलेले इथे दिसते. जगन्नाथाच्या रथयात्रेच्या वेळी देवांच्या रथांच्या रूपाने ही कला जगाच्या समोर आलेली दिसते.




























































