
>> आशा कोरान्ने
स्त्री आत्मचरित्र लेखनाच्या प्रेरणांचा शोध घेतांना मनात नानाविध प्रश्नांचे काहूर निर्माण करतात. आत्मनिष्ठेचा सहज व उत्कट आविष्कार मांडणाऱया आत्मचरित्रांमधून या प्रश्नांचा शोध घेताना विसाव्या शतकातील बदलत्या सामाजिकस्थितीचा व स्त्री-मनाचा एक विस्तीर्ण पट खुला होतो.
एखाद्या व्यक्तीने स्वतःच स्वतःच्या आयुष्याची सांगितलेली कथा म्हणजे ‘आत्मचरित्र.’ ’चूल आणि मूल’ एवढेच मर्यादित क्षेत्र असताना आपण जे जीवन जगतो ते शब्दातून मांडण्याची तिला गरज वाटली. अलीकडील काही दशकांत स्त्रियांच्या आत्मचरित्रांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे दिसून येते. गतकाळाचा मागोवा घेताना स्त्रीस्वभावानुसार जीवनातील अनेक घटनांचे वर्णन त्यातील सूक्ष्म तपशीलांसह करणे आत्मचरित्रातूनच शक्य होते. स्त्री आत्मचरित्र लेखनाच्या प्रेरणांचा शोध घेतांना अनेकवेळा असे लक्षात येते की, त्यात काही समान प्रवृत्ती आढळून येतात.
कर्तृत्ववान नवऱयासोबत आपण कसे जीवन जगलो याचा धांडोळा घेण्यासाठी अथवा इतरांना सांगण्यासाठी आत्मचरित्रे लिहिली गेली. आत्मनिष्ठेचा सहज व उत्कट आविष्कार त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांमधून आढळून येतो. 1910 मध्ये रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे सर्वात पहिले मराठी स्त्री-आत्मचरित्र. त्यानंतर आजतागायत प्रसिद्ध झालेल्या मराठी स्त्री आत्मचरित्रांची संख्या साधारणपणे अडीचशेच्या वर असेल. अर्थात या सर्व आत्मचरित्रांमधून विसाव्या शतकातील बदलत्या सामाजिकस्थितीचा व स्त्री-मनाचा एक विस्तीर्ण पट खुला होतो.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेने वेग घेतला आणि स्त्रीवरची बंधने काहीशी शिथिल झाली. त्यातच महर्षी कर्वे, महात्मा फुले यांसारख्या समाजधुरीणांच्या अथक प्रयत्नांमधून स्त्रियांना शिक्षणाचे दालन खुले झाले. आता शिकून शहाणी झालेली स्त्री हळूहळू स्वतःविषयी विचार करू लागली. स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करू लागली. स्त्री-पुरुष समानतेच्या मागणीमुळे या आत्मचरित्रांत पुरुषी विळख्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांचे, पुकारलेल्या बंडाचे व त्यामुळे झालेल्या शक्तिपाताचे वर्णन आढळून येऊ लागले. सोसलेल्या दुःखाचा आक्रोश, स्त्री मनाची घुसमट, कोंडमारा अनेक आत्मचरित्रांमधून प्रकट होऊ लागला.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील बहुतेक सर्व आत्मचरित्रे उच्चवर्णीय कुटुंबातील स्त्रियांनी लिहिलेली होती; परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निरनिराळ्या स्तरांतील स्त्रिया आपले मनोगत व्यक्त करू लागल्या. 1980 नंतर यात प्रचंड वाढ झाली. आत्मचरित्रांच्या पारंपरिक रूपाला प्रथम हादरा दिला तो हंसा वाडकर यांच्या ‘सांगत्ये ऐका’ या आत्मचरित्राने. स्त्रीकडे केवळ भोगदासी म्हणून पाहणाऱया पुरुषी वृत्तीचे अत्यंत भेदक वास्तव चित्रपटसृष्टीतल्या या कलावतीने समाजासमोर आणले. घर, कुटुंब, मूल यासाठी तडफडणाऱया पण हे सगळे नाकारणाऱया नवऱयाविरुद्ध बंड करण्याच्या भरात केवळ उद्ध्वस्तपणाच वाट़य़ाला आलेल्या मनाचे विदारक चित्र म्हणजे हंसाबाईंचे हे मनोगत! यानंतर पुढे अनेक वर्षांनी आलेल्या शांता हुबळीकर या नामवंत अभिनेत्रीच्या ‘कशाला उद्याची बात’मधूनही अशाच बेगुमान पुरुषी वृत्तीचे दर्शन होते.
1975 मध्ये आलेले सरोजिनी शारंगपाणी यांचे ‘दुर्दैवाशी दोन हात’ हे आत्मचरित्र विशेष लक्षवेधी ठरले. छळवादी आणि बनेल जोडीदाराकडून उपेक्षा वाट़याला येऊन दुर्दैवाचे दशावतार भोगायला लागले, आयुष्याची पुरती परवड झालेल्या लग्नाचे वर्णन सरोजिनीबाई ‘समारंभपूर्वक एक गुलाम घरात आणला’ असे करतात. पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे हे पहिले निशाण! आणि माणूस म्हणून सुरू झालेल्या स्व-शोधाची ही पहिली खूण!
आत्मचरित्रांच्या या लाटेत दलित स्त्रियांची आत्मचरित्रेही आपल्या वेगळ्या वैशिष्ट़यांमुळे ठळकपणे उठून दिसतात. सामाजिक अन्यायाचे, विषमतेचे भीषण वास्तव ही आत्मचरित्रे प्रकट करतात. माणसाचे अवघे माणूसपण हिरावून घेणाऱया, त्यांना हीन, लाचार बनवणाऱया समाजव्यवस्थेविरुद्धचा विद्रोह त्यांच्या शब्दाशब्दांतून ओसंडून वाहतो. गावकुसाबाहेरच्या जगाचे चित्रण करून ‘आम्हाला मंदिर-प्रवेश नको. अंतःकरण-प्रवेश पाहिजे.’ ही ‘बदलत्या खुणा’मधील मुक्ता सर्वगौड यांची मागणी तर कोणत्याही सहृदय व्यक्तीच्या काळजाला हात घालणारी. सामाजिक दुभंगलेपणाचे वर्णन करणारी ही लेखणी एका स्त्रीची होती, हे विशेष महत्त्वाचे!
यानंतर 1990 च्यादरम्यान लक्ष वेधून घेतले ते प्रथितयश पुरुषांच्या पत्नींनी लिहिलेल्या आत्मचरित्रांनी. प्रतिभावान पुरुषांच्या मागे राहून त्यांना प्रेरणा देणाऱया काही नामवंत व्यक्तींच्या पत्नींनी, सदैव प्रकाशात वावरणाऱया, लोकप्रियतेचे वलय लाभलेल्या आपल्या जोडीदारांचे त्यांच्या वाट्याला आलेले काहीसे विरूप चित्र या आत्मचरित्रांमधून मोठय़ा धिटाईने व मोकळेपणाने व्यक्त केलेले आढळून येते. कलंदर व्यक्तीचा संसार पाठीवर घेण्यामुळे खाव्या लागलेल्या खस्ता, त्याखाली दडपले गेलेले त्यांचे सत्त्व व स्वत्व विलक्षण ताकदीनिशी या आत्मचरित्रांमधून प्रकट होते. ढळढळीत दुःखापेक्षाही नाजूक जागी जाचत राहणारे सल किती दुखरे असू शकतात याची ही बोलकी भावचित्रे!
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीता देशपांडे व सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर सहचारिणी यशोदा पाडगावकर यांनी लिहिलेली, ‘आहे मनोहर तरी..’ व ‘कुणास्तव कुणीतरी..’ ही आत्मचरित्रे तर अनेकांच्या कुतूहलाचा विषय! महाविद्यालयातील कोवळ्या वयात पाडगावकरांवर उत्कट प्रेम करून मूळच्या ख्रिश्चन असलेल्या यशोदा पाडगावकरांनी संसारात पाऊल टाकले, पण पाडगावकरांच्या प्रियकर व पती या दोन रूपांतील तफावत त्यांना सतत धक्के देत राहिली. आठवणींच्या प्रदेशातील स्वैर भटकंती करता-करताच स्त्री-पुरुष सुरेख विश्लेषण सुनीताबाई करतात.
सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या ‘मी वनवासी’ या आत्मचरित्रात खडतर आयुष्य, गरिबी पतीने दिलेला त्रास यांना तोंड देण अनाथ मुलांची आई होण्याचे ध्येय त्यांनी कसं गाठलं याच चित्रण येत,तर सरिता आवाड यांच्या ‘हमरस्ता नाकारताना’ या आत्मचरित्रातून माणूस स्वशोधाचा मार्ग हरवून बसतो. भूतकाळातील अनेक बरे वाईट प्रसंग मनाच्या कप्प्यात घर करून बसलेले असतात. अशा प्रसंगाचे ओझे मनामध्ये साठलेले असते. ते शब्दबध्द करण्यासाठी आत्मचरित्राचे लिखाण हे एक साधन असून त्यामुळे भूतकाळाच्या आठवणीमधून मुक्त झाल्याची अनुभूती येते असे प्रतिपादन केले. रमाबाईंच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’पासून ते अगदी सरिता आवाड यांच्या ‘हमरस्ता नाकारताना’पर्यंत अनेक स्त्रीआत्मचरित्रे मनात नानाविध प्रश्नांचे काहूर निर्माण करतात.


























































