
चंद्रपूरचे माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. चंद्रपुरात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1967 ते 1978 असे 2 टर्म चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. अनेक नक्षल संबंधीत खटल्यात नक्षल्यांचे आणि आदिवासींचे वकील म्हणून त्यांनी काम केले.
1992 साली तत्कालीन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे नक्षल्यानी अपहरण केल्यावर सरकार-नक्षली यांच्यात मध्यस्थी घडवून आत्राम यांची सुटका करण्यात साळवे आघाडीवर होते. कायदा-नक्षल यावर विपुल लेखन आणि पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. “एन्काऊंटर” ही नक्षलवादावरील कादंबरी विशेष गाजली. लेखक म्हणून या कादंबरीने त्यांना साहित्यात ओळख मिळाली. जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामणी या मूळ गावी उद्या अंतिम संस्कार केले जाणार आहेत.


























































