पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस सुरूच, जेष्ठ महिलेला धक्का मारून मंगळसूत्र हिसकाविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांकडून हैदोस घातला जात आहे. पादचारी जेष्ठ महिलांना लक्ष्य करून दागिने हिसकाविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे. पतीसोबत रस्त्याने चाललेल्या एका जेष्ठ महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी 70 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेनउच्या सुमारास कर्वेनगरमधील अनुरेखा सोसायटीलगत रस्त्यावर घडली.

याप्रकरणी चारूशिला रमेश खेडकर (वय 68, रा. कर्वेनगर) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चारूशिला आणि त्यांचे पती रमेश दोन दिवसांपुर्वी कर्वेनगरमधील अनुरेखा सोसायटीलगत असलेल्या रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी चारूशिला यांना धक्का मारून त्यांच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. पती-पत्नीने आरडा-ओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करीत आहेत.

तळजाई टेकडीवर व्यायाम करण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाठलाग करून चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 30 हजार रूपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी सुजाता विठ्ठल मारणे (वय 47, रा. वडगाव बुद्रूक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अशा घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, रात्री-अपरात्री कामांवरून सुटणाऱ्या महिला, प्रवास करणाऱ्या जेष्ठ महिलांसह नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.