
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचेच सरकार येणार असे बहुतांश सर्वेक्षणवाल्यांचे मत असल्याने भाजप हडबडली आहे. त्यामुळेच काहीही करून बंगाल ताब्यात घ्यायचेच, अशी रणनीती भाजपने आखली. म्हणूनच एका केंद्रीय मंत्र्यासह चार खासदारांना विधानसभेत उतरविण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमधील उमेदवारांची तिसरी यादी भाजपने आज जाहीर केली. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना टॉलीगंज मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून खासदार लॉकेट चटर्जी यांना चुराचुरा येथून उतरविण्यात आले आहे. त्याशिवाय राजीव बॅनर्जी डोमजूरमधून तर अशोक लहरी (अलीपूरद्वार), अंजना बसू (सोनारपूर दक्षिण) आणि पायल सरकार यांना बेहाला पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याशिवाय काही दिवसांपूर्वीच तृणमूलमधून पक्षात आलेले अभिनेते यशदास गुप्ता यांनाही भाजपने चंडीतला मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
राज्यसभा सदस्य स्वप्नदास गुप्ता आणि पुचबिहार येथील खासदार निशिथ प्रमाणिक यांना विधानसभेसाठी आखाडय़ात आणले असून रवींद्रनाथ आणि प्रबीर घोषाल या तृणमूल काँग्रेसच्या माजी आमदारांना भाजपने तिकीट दिले आहे.

























































