
राज्यपाल भवन हे भाजपाचे कार्यालय झाले आहे. त्यामुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे. उद्योगपती अंबानींसाठी सचिन वाझेला बळी देण्याचा प्रयत्नही त्यांचा आहे. दोन्ही बाजूंनी ढोल वाजवून महाराष्ट्राची बदनामी करण्यात भाजपाला आनंद मिळत असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आदर्श माता पुरस्कार’ वितरण समारंभासाठी नाना पटोले रविवारी सांगलीत आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, लोकशाहीत राज्यपाल हे पद संविधानाने महत्त्वाचे आहे, पण महाराष्ट्राचे राज्यपाल संविधानाला आव्हान देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे संविधानच धोक्यात येत आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापासून महाराष्ट्राचा वापर करून बिहारची निवडणूक जिंकण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. आता तोच प्रकार सचिन वाझे प्रकरणातून सुरू आहे. सचिन वाझे प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा करीत आहे. मात्र, खोट्या बाबी समोर करून दोन्ही बाजूंनी ढोल वाजवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत आहेत.
उद्योगपती अंबानींच्या घरावर हेलिपॅडला परवानगी, कुटुंबातील सर्व सदस्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था यासाठीच स्फोटक गाडीचे प्रकरण उभे करण्यात आले आहे. ही गाडी अंबानींच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर होती. विशेष म्हणजे विधानसभा सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच या गाडीत स्फोटके नसल्याचे मान्य केले आहे. तरीही महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी वाझे यांची टेप वाजवली जात आहे, असेही ते म्हणाले.



























































