खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे दुकानदारावर वार, विश्रांतवाडीतील घटना, एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खर्चासाठी ५०० रूपये न दिल्याने एकाने हार्डवेअर दुकान मालकावर कोयत्याने वार केल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडीतील शांती हार्डवेअर अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक दुकानात घडली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

विनोद उत्तम पवार (३५, रा.रामगड वस्ती, कळसगाव, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संजय लक्ष्मण गोयल (२८, महालक्ष्मी विहर सोसायटी विश्रांतवाडी ) असे  गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गोयल याचे विश्रांतवाडीतील कळसमध्ये हार्डवेअर व इलेक्ट्रिकल्सचे दुकान आहे. आरोपी विनोद पेंटिंगचे कामे करतो. तो नेहमी संजय यांच्या दुकानात पेंटिंगचे साहित्य घेण्यासाठी जात होता. त्यामुळे त्यांच्यात ओेळख झाली होती. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विनोद संजय यांच्या दुकानात गेला. त्याने संजय यांच्याकडे ५०० रुपये मागितले. मात्र, धंदा न झाल्याने संजय यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला.
त्याचा राग आल्याने थांब तुझा जीवच घेतो, अशी धमकी देत विनोद तेथून निघून गेला. त्यानंतर काही वेळातच तो   कोयता घेऊन परत आला.  पैसे न दिल्याच्या रागातून त्याने संजय याच्या मानेवर कोयत्याने वार करून पसार झाला. हल्ल्यात संजय गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.