
अख्तर सांगतात, एकदा दोनजण हत्यारे घेऊन मला मारण्यासाठी घरी आली होती. यावेळी हत्तींनीच मोठमोठय़ाने आवाज करत आसपासच्या लोकांना उठवले. हा आवाज ऐकून हत्यारे घेऊन आलेल्या दोघांनी पळ काढला. माझा जीव वाचला.
पाटणाजवळील दानापूरच्या जानीपूर परिसरात राहणाऱया अख्तर इमाम यांनी दोन हत्तींच्या नावे आपली सारी संपत्ती केली आहे. विशेष म्हणजे एकुलत्या एक मुलाला जमीन आणि संपत्तीतून बेदखल करत त्यांनी पाच कोटींची संपत्ती हत्तींना दिली. हा निर्णय घेऊन नऊ महिने झाले आहेत, मात्र अख्तर यांना कधीच एकटे असल्यासारखे वाटत नाही. कारण त्यांचे जीवन म्हणजे हत्ती आणि हत्ती एवढेच बनले आहे. म्हणूनच लोक त्यांना हाथी काका म्हणतात.
अख्तर यांच्याकडे दोन हत्ती आहेत. एकाचे नाव राणी तर दुसऱयाचे नाव मोती आहे. अख्तर यांनी आपले जीवन हत्तींना समर्पित केले आहे. त्यांनी आपल्या संपत्तीचे विभाजन दोन भागांत केले आहे. पहिला हिस्सा त्यांनी पत्नीच्या नावावर केला आहे तर दुसरा हिस्सा हत्तींच्या नावावर. अख्तर यांच्या मुलाने त्यांना खूप त्रास दिलेला आहे. एका खोटय़ा प्रकरणात मुलाने त्यांना अडकवले होते. तसेच त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांचा मुलावर विश्वास नाही. दोन्ही हत्तींवर ते मुलासारखेच प्रेम करतात.
हाथी काका म्हणतात की, उद्या मी राहिलो नाही तर माझे घर, बँकेतील शिल्लक, जमीन आणि सगळी संपत्ती हत्तींची होईल. हत्तींना काही झाल्यास त्यांच्या वाटय़ाची संपत्ती ऐरावत संस्थेला मिळेल.




























































