नागपुरात लॉकडाऊन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे त्यावर अंकुश लावण्यासाठी आजपासून नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संचारबंदीला सुरुवात झाली आहे. पुढील सात दिवस नागपुरात कडक संचारबंदी लागू करण्याचे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्यानुसार संचार बंदीला सुरुवात झाली आहे. शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस विभागावर सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी शहरात शंभर ठिकाणी नाकेबंदी केली आहे. मात्र, तरीही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. बाजारपेठा बंद होत्या मात्र शहरात तुरळक वाहतूक सुरू होती, शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

नागपूर शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून सात दिवसीय संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून शहरातील सर्व बाजारपेठांसह दुकाने आणि व्यापारिक संकुले (मॉल) बंद करण्यात आली आहेत. संचारबंदी लागू होऊनही मुख्य रस्त्यांवरील वर्दळ पूर्णपणे कमी झालेली नाही. नागपूर पोलिसांनी प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दुचाकीवरून केवळ एकच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. तर, कारमध्ये दोघांना प्रवास करण्याची परवानगी पोलीस विभागाने दिली आहे.