
नीतेश राणे यांनी आपल्यावर केलेले आरोप हे पूर्णपणे तथ्यहीन असून त्यांनी याबाबत आपली सात दिवसांत माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर आपण मानहानीचा दावा दाखल करणार, असा इशारा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी भाजप आमदार नीतेश राणे यांना दिला आहे.
बेताल बडबड करीत बिनबुडाचे आरोप करणाऱया नीतेश राणे यांच्या आरोपांचा वरुण सरदेसाई यांनी समाचार घेतला. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब हेही उपस्थित होते. मी एका सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबातून आलो असून मी उच्चशिक्षित आहे. राणे कुटुंबीयांवर खून, अपहरण आदी विविध गंभीर गुन्हे दाखल असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच याचा पाढा वाचला होता. राणे कुटुंबीयांना राज्यातील जनता गांभीर्याने घेत नाही, असा टोला वरुण सरदेसाई यांनी लगावला.
नाहीतर कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा
नीतेश राणे यांनी माझ्यावर जे घाणेरेडे आरोप केले ते तथ्यहीन आहेत. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे. हे आरोप म्हणजे माझे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न असल्याचेही वरुण सरदेसाई म्हणाले.
पश्चिम उपनगरातल्या त्या नेत्याचे नाव सांगावे – अनिल परब
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील शिवसेनेचा एक नेताही वाझेंच्या संपर्कात होता, असा आरोप नीतेश राणे यांनी केला आहे. त्यावर परिवहनमंत्री अनिल परब यांनी राणे यांनी या नेत्याचे नाव सांगावे. नीतेश यांनी आता आरोप केले आहेत तर ते सिद्ध करण्यासाठी पुरावेही द्यावेत, असेही अनिल परब म्हणाले.






























































