पूर्व उपनगरात होणार तीन ट्रॉमा केअर सेंटर; काँग्रेस शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व उपनगरात पालिका लवकरच तीन अद्ययावत आरोग्य सुविधा असणारे ट्रॉमा केअर सेंटर उभारणार आहे. यामुळे हजारो सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. ऑक्टोबरपासून याबाबत कार्यवाही सुरू केली जाईल. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या शिष्टमंडळाला आज हे आश्वासन दिले.

मुंबईतील विविध प्रश्नांबाबत भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा उपस्थित होते. पश्चिम उपनगरात असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमुळे हजारो गोरगरीब-सर्वसामान्यांना फायदा होतो. मात्र पूर्व उपनगरात ट्रॉमा केअर सेंटर नसल्याने गैरसोय होते. त्यामुळे पूर्व उपनगरासाठी ट्रॉमा केअर सेंटर उभारावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी आयुक्तांनी कुर्ला, गोवंडी आणि कांजूरमार्ग येथे अद्ययावत सुविधा असलेले ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिल्याचे जगताप यांनी सांगितले. मुंबई डंपिंग ग्राऊंडमुक्त करण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी तळोजा येथे 52 हेक्टर जागेवर अद्ययावत डंपिंग ग्राऊंड सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. मलजल प्रकल्प सुरू करण्यासाठी वेगाने कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

कांदिवलीतील ‘त्या’ प्रकल्पबाधितांना आप्पापाडय़ात घरे

गोरेगाव पश्चिम भगतसिंग नगर येथील नाला रुंदीकरणातील 390 प्रकल्पबाधितांना मालाड आप्पापाडा येथे घरे देण्यात येणार आहेत. संबधित रहिवाशांनीच याबाबत तयारी दर्शवली आहे. त्यामुळे त्यांचे आप्पापाडा येथील ‘पीएपी’ घरांमध्ये स्थलांतर करावे आणि तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्थलांतर होईपर्यंत कारवाई करणार नाही, असे आश्वासन दिल्याचे जगताप यांनी सांगितले.