
रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी, पत्रकार बाळ बोठे याला पोलीस कोठडी मिळाली असून, पोलिसांनी त्याच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, दोन दिवसांपासून बोठेने चौकशीत सहकार्य केले नसल्याचे समोर आले आहे. या घटनेत बोठेला हैदराबाद येथे आश्रय देणाऱ्या व ताब्यात घेतलेल्या बोठेच्या वकिलाला सहाय्य करणारी ‘ती’ महिला फरार अद्यापि आहे. पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. दरम्यान, पोलिसांनी बोठे याचा आयफोन हस्तगत केला असून, त्याच्यातील माहिती तपासण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याला पोलिसांनी हैदराबाद येथून शनिवारी अटक करण्यात केली. त्याच्यासह आणखी तीनजणांनाही अटक करण्यात आली आहे. यात बोठेला हैदराबादमध्ये आश्रय देणाऱ्या वकील जनार्दन अकोला याचाही समावेश आहे. अकोला याला साहाय्य करणाऱ्या एका महिलेचेही नाव तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी तिला नोटीस बजावली आहे.
आरोपी बोठेला शनिवार (दि. 20) पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याने जरे यांचा खून कशासाठी केला, हे उघड व्हायचे आहे. पोलिसांनी बोठेच्या घरातून त्याचा आयफोन हस्तगत केला. या फोनमधील माहितीची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. मात्र, बोठे माहिती लपवत असल्याचे समोर आले आहे. बोठे याचा साथीदार तनपुरे यालाही पोलिसांनी अटक केली आहे. बोठे फरार झाल्यापासून तो त्याच्या ताब्यात होता. त्याचाही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या काळात बोठेने काही आर्थिक व्यवहार केले आहेत का याची माहिती पोलीस घेत आहेत. हैदराबादमध्ये ज्याठिकाणी बोठे याने मोबाईल वापरला, त्याचे सिमकार्ड त्याने कसे मिळविले याचाही तपास सुरू आहे.
बाळ बोठे याला व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा पोलिसांनी इन्कार केला आहे. इतर आरोपींप्रमाणेच त्याला वागणूक दिली जात असल्याचे आज पोलीस मुख्यालयात दिसून आले. चार तासांहून अधिक काळ तपासी अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तपासासंदर्भात बैठक झाली. तपासाच्या दृष्टिकोनातून कोणती कागदपत्रे मागवायची व तपास कशा पद्धतीने पुढे न्यायचा याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.





























































