जमीन व्यवहारात प्रताप सरनाईक यांचे नाव घ्या नाहीतर अटक करू! ईडीच्या अधिकाऱयांची कल्याणच्या बिल्डरला धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिटवाळय़ातील 78 एकर जमीन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मनी लॉण्डरिंग करून खरेदी केल्याचा लेखी जबाब द्या नाहीतर अख्ख्या कुटुंबाला अटक करू, अशी धमकी ईडीच्या अधिकाऱयांनी कल्याणचे बिल्डर योगेश देशमुख यांना दिल्याचा पर्दाफाश झाला आहे. देशमुख हे कोरोना पॉझिटिव्ह असतानाही कोरोनाचे नियम पायदळी तुडवत त्यांना खेचून अटक करण्याचा प्रयत्न ईडीच्या अधिकाऱयांनी केला, परंतु देशमुख यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर देशमुख यांच्या पत्नी शीतल यांनी सरनाईकांविरोधात ईडीला खोटा जबाब देण्यास कडाडून विरोध केल्यानंतर ईडीचे पथक मागे फिरले. विरोधकांचा छळ करण्यासाठी, त्यांना खोटय़ा प्रकरणात अडकवण्यासाठी केंद्राचे तपास अधिकारी कसे सूडाचे राजकारण करतात हे या घटनेतून उघड झाले आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जानेवारी महिन्यात कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आमदार सरनाईक यांची गुरवली येथील 78 एकर जमीन ईडीने जप्त केल्याचा आरोप केला होता. मुळात या जमीन खरेदीशी आपला काही संबंध नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आज सकाळी 7.30 वाजता ईडीचे पथक आधी सरनाईक यांच्या ठाण्यातील निवासस्थानी धडकले.

प्रताप सरनाईक नाहीत… चल, तू तयार हो!

सरनाईक हे कामानिमित्त सातारा येथे गेले आहेत. सरनाईक घरी नसल्याचे कळल्यानंतर ईडीच्या अधिकाऱयांनी त्यांचे पुत्र पूर्वेश यांच्याकडे मोर्चा वळवला. तुझे बाबा इथे नाहीत.. चल तू तयार हो… आम्ही तुला घेऊन जातो, असे ईडीच्या अधिकाऱयांनी पूर्वेश यांना सांगितले. पूर्वेश यांनी ईडीच्या अधिकाऱयांना संपूर्ण सहकार्य करत त्यांच्यासोबत जाण्याची तयारी केली. त्यानंतर अचानक त्यातील एका अधिकाऱयाने आता आम्ही तुला नेत नाही. दोन दिवसांनी येऊ तेव्हा घेऊन जाऊ, असे सांगितले आणि त्यांनी सरनाईक यांच्या घरातून काढता पाय घेतला.

कोरोनाचे नंतर बघू, आम्हाला स्ट्राँग केस उभी करायची आहे

माझे पती योगेश यांना कोरोना झाल्याने आमच्या बंगल्याचा परिसर सील करण्यात आला आहे. पतीला कोरोना झाला आहे हे सांगूनदेखील कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत ईडीचे अधिकारी घरात घुसले. कोरोनाचे नंतर बघू, आम्हाला सरनाईक यांच्या विरोधात स्ट्राँग केस उभी करायची आहे अशी अधिकाऱयांनी अरेरावी केल्याचा आरोपही शीतल देशमुख यांनी केला.

चौकशीसाठी नव्हे, तर खोटा जबाब घेण्यासाठी ते आले

आमच्या चौकशीसाठी नव्हे, तर सरनाईक यांच्याविरोधातील खोटा जबाब घेण्यासाठी ईडीचे अधिकारी माझ्या पतीला घेऊन जाण्यासाठी आले होते, असा गंभीर आरोप शीतल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत आमच्या जमिनीचा व्यवहार झालेला नाही. काही कारणामुळे हा व्यवहार रद्द झाला होता. यासंदर्भात आमची केस सुरू आहे. मात्र प्रताप सरनाईक यांनी ही जागा घेतली आहे. त्यांनी जमिनीसाठीचा पैसा मनी लॉण्डरिंगमधून उभा केला असा जबाब द्या, असा दबाव वारंवार ईडीचे पथक आमच्यावर आणत होते असा आरोपही शीतल यांनी केला.

कल्याणमध्ये अर्धा तास ईडीची जुलूम जबरदस्ती

ज्या जमिनीच्या तपासासाठी ईडीचे अधिकारी कल्याणमध्ये आले. त्या जमिनीचा संबंध बिल्डर योगेश देशमुख यांच्याशी आहे. त्यामुळे ईडीचे अधिकारी गोदरेज हिल परिसरातील योगेश देशमुख यांच्या ‘विराजमान’ बंगल्यावर पोहोचले. या पथकात दहा अधिकारी होते. त्यापैकी एक महिला होती.  योगेश देशमुख यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे. ईडीच्या अधिकाऱयांनी त्याही अवस्थेत त्यांना खेचून अटक करण्याची तयारी केल्याने योगेश देशमुख यांची प्रकृती आणखी खालावली आणि त्यांना उपचारासाठी मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, देशमुख यांच्या पत्नी शीतल यांचा ईडीच्या पथकासोबत वाद झाला. तब्बल अर्धा तास ईडीच्या अधिकाऱयांची जुलूम जबरदस्ती सुरू होती. नंतर अखेर त्यांचे पथक माघारी फिरले.

घाणेरडय़ा राजकारणाने कुटुंब उद्ध्वस्त होईल

केंद्रीय तपास यंत्रणा असलेली ईडी खोटा जबाब देण्यासाठी दबाव टाकत असल्याचे पाहून संताप तर आलाच, शिवाय धक्का बसल्याचे शीतल देखमुख यांनी सांगितले. या सगळ्या घाणेरडय़ा राजकारणात आम्ही, शेतकरी आणि मध्यस्थ भरडले जात आहोत. त्याचा त्रास आम्हाला होत असून कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.