
लॉकडाऊन काळातील सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या वीज बिलात घरगुती वीज ग्राहकांना सवलत मिळावी या मागणीसाठी शुक्रवार 19 मार्च रोजी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्यावीतने राज्यभरात रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांची रोजीरोटी पूर्णपणे थांबलेली असतानाही घरगुती वीज ग्राहकांना एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत अवाच्या सवा वीज बिले आली होती. त्यामध्ये सरकारने सवलत द्यावी म्हणून वीज ग्राहकांकडून वारंवार मागणी होत आहे, सर्वसामान्यांचा हा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी संघटनेच्यावतीने राष्ट्रीय मार्गांबरोबरच राज्यमार्ग आणि जिल्हामार्गांवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईसह राज्यभरातील सर्वच घरगुती वीज ग्राहकांना लॉकडाऊनकाळात अवाच्या सवा वीज बिले आली होती. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने सर्वसामान्यांचे उत्पन्न ठप्प झाले होते. तसेच शेतकऱयांच्या वीज बिलाबाबत तक्रारी आहेत. त्याची दखल घेत सरकारने अधिवेशनाच्या सुरुवातीलाच वीज बिल वसूलीबाबतच्या कारवाईला स्थगीती दिल्याने वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले होते, मात्र सरकारने पुन्हा वीज बिल वसूलीच्या कारवाईवरील स्थगिती ऊठवली आहे. त्याविरोधात शुक्रवारी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेसह विविध संघटनांकडून ठिकठिकाणी रस्तारोको आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.

































































