युद्धग्रस्त भूमीतली काव्यबीजे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> समीर गायकवाड

उर्वरित जगापेक्षा प्रचंड तफावत असणारी युद्धग्रस्त भूमी जिथं काव्य स्फुरतं एका वेगळ्या आयामातून. कुठल्याही तऱहेची शांतता, सुव्यवस्था नसताना, मानवी जीवनमूल्यं धुळीस मिळाल्याचा अनुभव घेताना प्रसवलेलं काव्य खेद-खंत याच्या पलीकडच्या जाणिवा देतं. आजच्या जागतिक काव्यदिनी अशाच काही कवितांचा हा धांडोळा.

कविता कुठल्याही एका विशिष्ट भावनेचे प्रकटीकरण करत नाही. कवितेला कोणत्याही बंधनात अडकवून ठेवता येत नाही. प्रांत, भाषा, वर्ण, लिंग, वय, वर्ग कशाचेही तिला वावगे नाही. कवितेस सर्व स्वीकारार्ह आहे, तिला वर्ज्य काही नाही. नवरसांनी ती न्हाऊन निघाली आहे. कविता कशी सुचते इथपासून ते कुणी कविता लिहावी इथपर्यंतच्या गोष्टींवर अनेक विख्यात साहित्य पंडितांनी आपली मते मांडली आहेत. कवितेला म्हटलं तर वाङ्मयीन संहिता आहेतही आणि नाहीतही! कवितेची मांडणी आणि आशय प्रकटीकरण व्यक्तिपरत्वे भिन्न आहे. अनेक नामवंत कवी आणि त्यांच्या कवितांवर खूप काही लिहिलं गेलं आहे आणि त्याविषयी अमर्याद चर्चासत्रे झडली आहेत.

जागतिक कविता दिन म्हटलं की, काही ठरावीक काव्य प्रकार, गाजलेली नावे आणि तोंडपाठ असलेल्या वा कधीकाळी वाचलेल्या कविता यांचंच स्मरण होतं. प्रत्यक्षात प्रचंड वेगवेगळी भौगोलिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक तफावत असणाऱया पार्श्वभूमीवर जगभरात विविध ठिकाणी काव्यनिर्मिती होते आहे. याविषयी खूप कमी लिहिलं वा बोललं जातं. यातीलच एक काव्यबिंदू युद्धग्रस्त देशांचा आहे. जगात आजमितीला अशी काही राष्ट्रे आहेत की, जिथे गेली काही दशके युद्धग्रस्त वातावरण आहे, कुठल्याही तऱहेची शांतता सुव्यवस्था तिथे नाही, मानवी जीवनमूल्ये तिथे पूर्णतः धुळीस मिळाली आहेत अशाच काही कवितांचा हा छोटासा धांडोळा.

ज्या इराकमध्ये गृहयुद्ध आणि अशांतता यांनी राज्य केलं आहे, तिथले कवी ओबेदुल जाबिरी यांच्या फेडिंग या कवितेत शांततेवर भाष्य केलंय. आसपास जिथं तोफांचे आवाज घुमतात आणि मृत्यूचे तांडव चालते तिथल्या एका कवीला शांतिदूत समजल्या जाणाऱया कबूतराच्या वृद्धत्वावर कविता सुचावी हेच मुळात गूढरम्य आहे. एक विलोभनीय शब्दचित्र साकारण्याची ताकद या कवितेत आहे. कविता आणि जगणं समृद्ध व्हावं असे वाटत असेल तर असलं थोडंफार तरी वाचलंच पाहिजे.

ती मादी कबूतर जेव्हा वयस्क होईल
तेव्हा तिचे पंख करडे होत जातील,
तिचं हुंकार भरणं दमत जाईल
तेव्हा कल्पना करा ती कुठे जाईल?
कोवळ्या चिमण्यांसाठी ती
दिशादर्शक आरशात परावर्तित होईल काय?
की एखाद्या मूक खिडकीला गाता यावं म्हणून डहाळी होईल काय?

लंडन येथे वास्तव्यास असणारे जॉर्डनचे कवी-लेखक याह्या न्युमेरी अल नैमत ऊर्फ अमजद नासीर यांच्या hadhian (विमनस्क) या अरेबिक कवितेत प्रौढत्वास पोहोचलेल्या एका कवीच्या मातेचे निधन होते आणि त्याला सर्वत्र तिचा गंध जाणवू लागतो. ज्यातून त्याला सुटका नकोय, पण त्याला त्याची खेद-खंत आहे. कारण आई हयात असताना इच्छा असूनही त्याला तिचा सहवास लाभला नाही. मग या गंधापासून दूर जात पूर्वीसारखं आईच्या सहवासाच्या ओढीतलं स्वच्छंदी जगणं वाटय़ास येईल का? हा कवीचा प्रश्न खूप घायाळ करून जातो. जॉर्डनसारख्या अस्थिर देशात ही हळवी कविता लिहिली गेलीय हे विशेष होय.

मी कुठेही गेलो तरी संध्येस त्याच खोलीत असतो,
जी माझ्या आईने अज्ञात पानाफुलांच्या
सुगंधाने भरलेली असते
हा सुगंध माझ्या सोबतच असतो जणू
माझी आई देवाघरी गेली
आणि तेव्हापासून ही गंधभारित खोली माझ्या सवे असते
बालकवींच्या ‘औदुंबरा’सारखा हा गंध माझा पिच्छा करतो

खरे तर आपले आयुष्य आपण जितके उद्ध्वस्त करू तितका विध्वंस आपला पाठलाग करत राहतो. पॅलेस्टिनी कवी खालेद अब्दुल्लाह यांच्या ‘सीड्स इन फ्लाईट’ या कवितेत खुबीने डेझीचं रूपक वापरलंय. इथे संदर्भ त्यांच्या मायभूमी पॅलेस्टाइनचा आहे. इस्रायलने कितीही आणि कसलीही दडपशाही केली तरी त्याला उत्तर देणारी माणसं (डेझीची फुलं) नकळत अस्तित्वात येत राहतील असं ते सुचवतात. पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांच्यातल्या वैरास असंख्य घटना, बिंदू कारणीभूत आहेत. यापैकीच एक कारण आहे गाझापट्टीची लसलसती जखम. जिथे कवीच्या मातृभूमीच्या विलगतेची धगधगती दुःखे सातत्याने प्रसवतात. याच गाझापट्टीतील दैर-अल-बह या शहरात 1970 साली खालेद अब्दुल्लाह यांचा जन्म झाला. त्यांच्यावरील बंधनांपायी 2001 पासून ते फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये वास्तव्यास आहेत. संघर्षमय वातावरणात वाढलेल्या कवीच्या या जाणिवा काळजाला स्पर्श करून जातात.
वाऱ्यावरची बीजे..
एक आदिम स्त्री, जी सर्व ऋतू जगली होती
डेझीची सुगंधी फुलं गोळा करत
दिशाहीन चालायची
तिच्या पदरातलं प्रत्येक फूल म्हणजे जणू तारा
तिचा पदर म्हणजे आकाश
जेव्हा ती घरी परतायची
किनाऱयावर शिंपले विखरावीत
तद्वत फुले उधळायची
त्यांना सौभाग्य लाभावं,
भविष्याशी कुजबुजता यावं
याची मुभा द्यायची
तिच्या लग्नाची वस्त्रं,
डेझीच्या सुक्या फुलांनी भरून गेली
पण पुढच्या ऋतूत जेव्हा भविष्याचा नवकाळ आला
त्याने फुलांची कुजबुज शांत केली,
पूर्वजांशेजारी तिला दफन केलं गेलं
आणि तरीही एका अवधीने, एका जादूने,
जणू एका चमत्काराने
घराच्या परसदारात प्रत्येक मौसमात डेझी उगवतेच आहे; डेझीची अनेक बीजे उडून गेलीत, पण ही टिकून आहेतच…

प्रसिद्ध इराकी कवी खादीम खंजेर यांच्या ‘जमायती मकबरा’ या कवितेतील काही पंक्ती देऊन थांबतो. कवी ज्या परिसरात जगतो, वाढतो, जन्मतो त्याचे पडसाद त्याच्या रचनेत निश्चित उमटतात. त्याने अनुभवलेल्या जाणिवा, त्याच्या भोवतालची परिस्थिती, त्याच्या वाटय़ाला आलेलं आकाश या साऱयांचं प्रतिबिंब त्याच्या साहित्यात पडतं. कवी खादीम यांनी इराकमधला जीवघेणा हिंसाचार, नरसंहार ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला असल्याने त्यांच्या कवितेत त्याचं चित्र रेखाटलं जाणं साहजिक आहे. कवीच्या भावाचा मृत्यू नेमका कधी, कुठे, कसा आणि का झाला हे त्याला माहीत नाही, पण त्याची अखेर त्याने कशी अनुभवली याचे शब्दचित्र अत्यंत दाहक आणि वेदनादायक आहे. या कविता जगणं समृद्ध करतात आणि जगण्याविषयी कृतज्ञता जागवतात.
आताच मेडिकल रिपोर्ट आलाय, ज्या हाडांची थैली मिळाल्याची पोचपावती मी दिलीय, ती थैली ‘तुझी’ आहे असं त्यात म्हटलंय.
पण ती खूपच किरकोळ आहे.
घरी नेऊन टेबलावरती सगळी हाडे मी विखरून ठेवली आहेत,
त्याचे त्यांनी बारकावे दिलेत – सहा छिद्रे असलेली कवटी, एक क्लेव्हिकल, तीन फासळ्या, तासलं गेलेलं फिमर, मनगटातील हाडांचा बुकणा आणि काही मणके
हा इतकासा ऐवज म्हणजे तू कसा काय असू शकतोस बंधू? पण… सगळी हाडे मी पुन्हा थैलीत ठेवलीत.
माझ्या हातांवर चढलेली त्या हाडांवरची मातकट धूळ मी झटकली,
टेबलावर पडलेली उरलीसुरली मातकट धूळही फुंकून टाकली आणि तुला माझ्या ‘पाठीवर’ घेऊन मी बाहेर पडलो.

[email protected]